Mumbai : आता सैफ अली खानला धमकी; पोलिसांकडून तपास सुरू 
मुंबई

Mumbai : आता सैफ अली खानला धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला जिवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला जिवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी झिशान अख्तर याच्या नावाने हा धमकीचा व्हॉइस मेसेज आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना, तुषार कपूर यांच्यासह अनेक कलाकारांना धमक्या आल्या असल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सोक्षमोक्ष लावण्याचे लक्ष्य पोलिसांपुढे आहे.

झिशान अख्तरच्या नावाने सैफ अली खानच्या मोबाईलवर एक व्हॉइस मेसेज आला असून ‘तुझीही अवस्था बाबा सिद्दीकींसारखीच केली जाईल’, असा इशारा देण्यात आला आहे. हा संदेश खरोखरच झिशान अख्तरने पाठवला आहे की त्याच्या नावाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कोणीतरी खोडसाळपणा करत आहे, याची पडताळणी मुंबई पोलीस करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई पोलिसांनी अलीकडेच बेंगळुरू येथील ३० वर्षीय आयआयटी पदवीधर वैभव मिश्रा याला अटक केली होती. कोणत्याही टोळीशी संबंध नसतानाही त्याने 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करून आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर या अभिनेत्यांना धमक्या दिल्याचे तपासात उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर सैफ अली खानला आलेल्या धमकीमागेही असाच काही प्रकार आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, याआधी जानेवारी महिन्यातही मुंबईतील राहत्या घरी एका घुसखोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता, ज्यात तो जखमी झाला होता.

वैयक्तिक धमक्यांसोबतच महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'जलसा' बंगल्याला गेल्या महिनाभरात मुंबई आणि पुण्यातून पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये बॉम्बस्फोटांद्वारे लक्ष्य करण्याबाबत धमक्या आल्या आहेत.'खलिस्तान नॅशनल आर्मी' या कथित संघटनेच्या नावाने १२ नोव्हेंबरला पाठवलेल्या ईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांचा बंगला, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी स्टेडियम, मुंबई महापौर कार्यालय, पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) शाखा आणि पुणे महापालिका मुख्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने केलेल्या तपासणीत संबंधित ठिकाणी कोणतीही स्फोटके आढळली नाहीत. यापूर्वी १० जून आणि ३ नोव्हेंबर रोजीही पुणे महापालिकेला असेच ईमेल आले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश

Mumbai : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार

PF काढा हप्त्यांवर! खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा; सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ