देवश्री भुजबळ
मुंबई : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य आणि अनावश्यक आहे. डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करावी. नागरिकांनी गणेशोत्सव पुन्हा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याकडे वळावे, असे आवाहन मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त ‘फ्री प्रेस जर्नल-नवशक्ति’ला दिलेल्या मुलाखतीत घाडी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, डीजेचा वापर, मूर्तींची वाढती उंची, मंडळांसाठी एसओपी तसेच महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर भाष्य केले.
दरवर्षी आपण आपल्या घरी गणेशोत्सव कसा साजरा करता? यंदा काय वेगळे आहे?
माझे मूळ कोकणातील देवगडचे आहे. आमच्या घरी पिढ्यान्पिढ्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. संपूर्ण विस्तारित कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करणे ही आमची दरवर्षीची परंपरा आहे. मात्र, यंदाचा गणेशोत्सव निश्चितच वेगळा आहे. मुंबईचा उपमहापौर म्हणून मला शहरातील विविध गणेशोत्सवांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागणार आहे. अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देणे, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तयारी आणि व्यवस्थेची पाहणी करणे, अशा विविध जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी मला माझ्या गावी जाता येणार नाही. घरातील सर्व धार्मिक विधी माझे चुलत भाऊ पार पाडत आहेत.
पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याबाबत नागरिकांमध्ये आता अधिक जागरूकता दिसते का?
पर्यावरण संवर्धनाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. प्रशासनाकडून जनजागृती केली जात असतानाच भाविकही स्वतःहून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे वळत आहेत. मातीच्या मूर्ती, कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन, पर्यावरणपूरक सजावट यांना वाढती पसंती मिळत आहे. यंदा मातीच्या गणेशमूर्तींची संख्या वाढली आहे. महापालिकेने यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक म्हणजे २५ हजार ४०० लिटर नैसर्गिक रंगांचे वाटप केले आहे.
महाराष्ट्रात सणांच्या काळात डीजेच्या वापरावरून वाद सुरू आहेत. याबाबत आपले काय मत आहे?
डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होते, यात कोणतीही शंका नाही. आवाजाची तीव्रता इतकी मोठी असते की, निरोगी व्यक्तीलाही हृदयाची धडधड वाढल्यासारखे वाटू शकते. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा अधिक त्रास होतो. पुण्यात डीजे आणि मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. यापूर्वीही इतर अनेक शहरांमध्ये अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारने ध्वनिप्रदूषणाविरोधातील कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी माझी विनंती आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणपती समन्वय समितीने २००८ मध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींची उंची १८ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा ठराव केला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही?
गणेशोत्सवात हजारो मंडळे सहभागी होतात. त्यामुळे राज्य सरकारने यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीत सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आदींचा समावेश असावा. मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणत्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, काय करावे आणि काय करू नये, याची स्पष्ट माहिती त्यात असावी. दरवर्षी या एसओपीचे पालन होते की नाही, याचे परीक्षण किंवा ऑडिटही करण्यात यावे.
सुरक्षित गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून कोणती पावले उचलली जात आहेत?
महापौर रितू तावडे आणि मी गणेशोत्सवापूर्वी विविध ठिकाणी भेटी देऊन तयारी आणि व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. विशेषतः प्रमुख विसर्जनस्थळांवरील व्यवस्थेची पाहणी करण्यात आली आहे. भाविकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची असल्याने त्याला प्राधान्य देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुरेशी प्रकाशव्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.