Mumbai : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट करणार इमारत खरेदी; मंदिरालगत गृहनिर्माण संस्थेच्या बिल्डिंगसाठी ९४ कोटींचा निधी मंजूर 
मुंबई

Mumbai : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट करणार इमारत खरेदी; मंदिरालगत गृहनिर्माण संस्थेच्या बिल्डिंगसाठी ९४ कोटींचा निधी मंजूर

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात देश-विदेशातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या मंदिरालगतची एका गृहनिर्माण संस्थेची इमारत खरेदी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात देश-विदेशातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या मंदिरालगतची एका गृहनिर्माण संस्थेची इमारत खरेदी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी ९४ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आली असून मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि इतर अनुषंगिक खर्च पाहता ही रक्कम १०० कोटींच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. विधि आणि न्याय विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

राम मॅन्शन सोसायटीची ही मालमत्ता मंदिराच्या सध्याच्या प्रतीक्षालय इमारतीला लागून आहे. या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ ७०८ चौरस मीटर असून, त्यामध्ये १३ निवासी सदनिका आणि सात व्यावसायिक जागांचा समावेश आहे. मंदिर परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेता भाविकांच्या रांगांचे व्यवस्थापन, प्रसादालय, स्वयंपाकगृह, साठवणगृह, यात्री निवास आणि मर्यादित वाहनतळ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या जागेचा उपयोग होऊ शकणार आहे.

व्यावसायिक जागांसाठी १.११ लाख रुपये प्रति चौरस फूट

मंदिर न्यासाच्या व्यवस्थापन समितीने निवासी सदनिकांच्या खरेदीसाठी प्रति चौरस फूट ६६ हजार रुपये या दराला तत्त्वतः मान्यता दिली होती. या दराची गणना संबंधित सदनिकेचे मूळ चटई क्षेत्र आणि त्यावर ४० टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र यानुसार करण्यात येणार आहे. तर व्यावसायिक जागांच्या चटई क्षेत्रासाठी प्रति चौरस फूट १ लाख ११ हजार रुपये या दराला, शासनाच्या मान्यतेच्या अधीन राहून, तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती.

सिद्धिविनायक मंदिरात वर्षभर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः सण, उत्सव आणि गर्दीच्या काळात भाविकांच्या रांगांचे नियोजन करण्यासाठी तसेच अतिरिक्त मंडप उभारणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी न्यासाला दरवर्षी मोठा खर्च करावा लागतो. मंदिरालगतची मालमत्ता उपलब्ध झाल्यास भाविकांच्या रांगांचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करता येईल. त्याचबरोबर प्रतीक्षालय, स्वयंपाकगृह, साठवण व्यवस्था, यात्री निवास आणि इतर आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest : झुरळे आज पुन्हा रस्त्यावर; मार्च रोखण्यास न्यायालयाचा नकार, तर पालिकेचा खोडा

मसाल्यात भेसळ केल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड; FDA ची नवी नियमावली जारी

१ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

१७ राज्यांमध्ये ‘एसएसआर’; निवडणूक आयोगाची घोषणा

मुंबई पोलिसांची अभिनेता इम्रान खानला नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश