Mumbai : लैंगिक पुनर्रचना शस्त्रक्रियेत सायन रुग्णालय अव्वल; तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया यशस्वी संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : लैंगिक पुनर्रचना शस्त्रक्रियेत सायन रुग्णालय अव्वल; तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबईतील प्रमुख महापालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालयाने (सायन हॉस्पिटल) लिंग बदलण्याच्या (जेंडर रीअसायन्मेंट) शस्त्रक्रियेमध्ये आघाडी घेतली आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई : मुंबईतील प्रमुख महापालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालयाने (सायन हॉस्पिटल) लिंग बदलण्याच्या (जेंडर रीअसायन्मेंट) शस्त्रक्रियेमध्ये आघाडी घेतली आहे. आरटीआय आरोग्य कार्यकर्ते चेतन कोठारी यांच्याशी झालेल्या संवादातून ही माहिती समोर आली. या माहितीनुसार सायनमध्ये गेल्या तीन वर्षांत अशा एकूण ३५ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. याशिवाय, नायरमध्ये दरवर्षी जन्मजात लिंगविकार असलेल्या ८ ते ९ केसेस उपचारासाठी येतात.

आरटीआयच्या उत्तरातून विविध रुग्णालयांच्या आकडेवारीतील तफावत स्पष्ट होते. सायन रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाने गेल्या तीन वर्षांत ‘टॉप आणि बॉटम’ सर्जरीसह ३५ लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया केल्याचे म्हटले आहे. तथापि, या शस्त्रक्रिया यशस्वी की अपयशी ठरल्या, याचे वर्गीकरण करण्यासाठी कोणतेही निश्चित निकष नसल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. रुग्णालयाच्या सामान्य शल्यचिकित्सा विभागाने मार्च २०२३ पासून ट्रान्सजेंडर रुग्णांसाठी १४ शस्त्रक्रिया स्वतंत्रपणे केल्याची माहिती दिली आहे. ही आकडेवारी वेगवेगळ्या विभागांची असून स्पष्टीकरण दिल्याशिवाय ती प्लास्टिक सर्जरीच्या आकडेवारीत जोडली जाऊ नये.

मानसोपचार मूल्यमापन बंधनकारक

लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेपूर्वी मानसोपचार मूल्यमापनाचे महत्त्व या आरटीआय उत्तरातून अधोरेखित होते. ‘जेंडर डिस्फोरिया’ (लिंग असंतोष) सिद्ध करण्यासाठी आणि व्यक्ती शस्त्रक्रियेसाठी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान दोन पात्र मानसोपचार तज्ज्ञांचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचे सायन रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

प्रजनन क्षमता, लैंगिक जीवन

शस्त्रक्रियेनंतर प्रजनन क्षमता आणि लैंगिक जीवनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर, पुरुष ते स्त्री लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर संबंधित व्यक्ती गर्भवती राहू शकत नाही, असे नायर आणि जे. जे. रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, शस्त्रक्रियेनंतर लैंगिक जीवन शक्य असल्याचे रुग्णालयांनी नमूद केले.

जागरूकता वाढवण्याची गरज

आरोग्य कार्यकर्ते चेतन कोठारी यांच्या मते, पालिकेने व सरकारने त्याविषयी व्यापक जनजागृती केली पाहिजे. ‘अनेक गरीब कुटुंबातील लोकांना अशा शस्त्रक्रिया करायच्या असतात, पण उपलब्ध सेवांची माहिती नसते. ज्यांना आपले शरीर आपल्या लिंग ओळखीशी जुळत नसल्याची भावना वाटते, त्यांना वैद्यकीय सल्ल्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे,’ असे ते म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : तयार फराळाला महागाईची फोडणी; दरांमध्ये झाली ३० ते ४० टक्क्यांनी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री

इंडिया आघाडीचा ‘सार्वजनिक महाभियोग’ कार्यक्रम आज

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : जखमी चालक, ब्लॉगरला रुग्णालयातून डिस्चार्ज

FDA तील चार अधिकारी निलंबित; कारवाई करताना अनियमितता, २१ जणांविरुद्ध विभागीय चौकशी

६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय