मुंबईतील धावपळीची जीवनशैली लोकांच्या झोपेवर परिणाम करत आहे. नुकत्याच एका सर्वेक्षणानुसार ५० टक्के लोकांना दररोज ६ ते ८ तासांची झोप मिळते. उर्वरित मुंबईकरांना झोप न मिळण्यामागे विविध कारणे असून यात मोबाईलचा अतिवापर, मुले, जोडीदार, रात्री वारंवार लघवीसाठी उठणे, अयोग्य पलंग, घरकामे आणि स्लीप एपेनियासारख्या वैद्यकीय समस्या अशी अनेक कारणे दिली.
'लोकल सर्कल्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशातील नागरी आणि जीवनशैलीशी संबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करते. त्यात त्यांनी मुंबईसह देशभरात निद्रानाशाच्या अनेक कारणासंदर्भात सर्वेक्षण करून माहिती गोळा केली.
मोबाईल ठरतोय झोपेतला मोठा अडथळा
सर्वेक्षणादरम्यान मुंबईतील १२ टक्के लोकांनी सांगितले की, मोबाईल संदेश हे त्यांच्या आठ तासांच्या झोपेत सर्वात मोठे व्यत्यय आणणारे कारण आहे तर ५४ टक्के लोकांनी सांगितले की, रात्री एक किंवा अधिक वेळा लघवीसाठी उठावे लागल्याने झोप खंडित होते. त्याचप्रमाणे ४३ टक्के लोकांनी उशिरा झोपणे, सकाळचे वेळापत्रक किंवा घरगुती कामांमुळे झोपेत व्यत्यय येतो असे सांगितले. सुमारे १६ टक्के लोकांनी मुलांमुळे किंवा जोडीदारामुळे झोपेत व्यत्यय येतो, असे सांगितले तर ७ टक्के लोकांनी अयोग्य पलंगाला जबाबदार धरले. सुमारे २३ टक्के लोकांनी डास आणि बाहेरील आवाजामुळे झोपेत अडथळा येतो असे सांगितले, २६ टक्के लोकांना सलग आठ तास झोप येत नाही, तर ६ टक्के लोकांनी स्लीप एपेनियासारख्या वैद्यकीय समस्यांमुळे पुरेशी झोप मिळत नाही, असे सांगितले.
हलके जेवण, संगीताने झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा
सर्वेक्षणातील सुमारे ४८ टक्के लोकांच्या मते आनंदी आणि शांत घराचे वातावरण चांगल्या झोपेसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. याशिवाय ३३ टक्के लोक रात्री हलके जेवण घेणे, ३१ टक्के लोकांना व्यायाम केल्याने, २७टक्के लोकांना आरामदायी कपड्यांमुळे चांगली झोप येते असे म्हणाले तर सुमारे २० टक्के लोक रात्री १० वाजण्यापूर्वी झोपण्याचा प्रयत्न करतात, १९ टक्के लोक डासांपासून बचावाचे उपाय केल्याने तर १५ टक्के लोकांनी शांत संगीत ऐकल्याने चांगली झोप येते, असे सांगितले.
धक्कादायक बाबी
सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यात ३० टक्के लोक दररोज केवळ ४ ते ६ तास झोपतात. सुमारे १५ टक्के लोकांना फक्त ४ तासांचीच झोप मिळते. दुसरीकडे ३ टक्के लोक १० तासांपेक्षा जास्त झोप घेतात, तर २ टक्के लोक ८ ते १० तास झोप घेतात.
प्रश्नावली काय होती?
सहभागींना चार प्रश्न विचारण्यात आले होते. मागील १२ महिन्यांत त्यांना रात्री साधारणपणे किती तास अखंड झोप मिळाली, झोपेत कोणत्या गोष्टी अडथळा आणतात आणि झोपेची कमतरता कशी भरून काढतात, याबाबत प्रश्न विचारले गेले.
या सर्वेक्षणात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. यात मुंबईतील १० हजार ४४८ जण सहभागी झाले होते. या सर्वेक्षणात देशातील ३४८ जिल्ह्यांतील रहिवाशांकडून ४३ हजारांहून अधिक प्रतिसाद मिळाले. त्यापैकी ६१ टक्के पुरुष आणि ३९ टक्के महिला होत्या.सचिन टपारिया, संस्थापक, सोशल सर्कल्स
सुट्टीच्या दिवशी घेतात अतिरिक्त झोप
सर्वेक्षणात असेही आढळले, की २५ टक्के लोक आठवड्याच्या शेवटी जास्त वेळ झोप घेऊन झोपेची कमतरता भरून काढतात. सुमारे २९ टक्के लोक रविवारी दुपारची झोप घेऊन भरपाई करतात, तर २७ टक्के लोक सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपून गमावलेली झोप पूर्ण करतात.