मुंबई

एसआरए कार्यालयात सुनावणीचा फार्स; पाच सुनावणीनंतरही हक्काचे घर मिळेना, १ मेपासून उपोषण

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या घरामधील घुसखोराला घराबाहेर काढण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून एसआरए कार्यालयात सुनावणीचा फार्स सुरू आहे.

Swapnil S

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या घरामधील घुसखोराला घराबाहेर काढण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून एसआरए कार्यालयात सुनावणीचा फार्स सुरू आहे. तीन वर्षात तब्बल ५ सुनावणी झाल्यानंतरही यामध्ये अंतिम निकाल लागलेला नाही. एसआरए कार्यालयात हेलपाटे घालून त्रस्त झालेल्या एका पत्रकारानेच अखेर प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यानुसार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १ मे या महाराष्ट्र दिनापासून एसआरए कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

महालक्ष्मी सात रस्ता येथील जे. आर. बोरीचा मार्ग येथे श्रमिक एकता फेडरेशन गृहनिर्माण संस्था अंतर्गत काही वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात आली आहे. योजनेंतर्गत तयार झालेल्या इमारतीत सदनिका क्रमांक सी १६०१ ही दिवंगत प्रभू पांडुरंग पेणकर यांचे नावे एसआरएच्या सोडतीत सदनिका जाहीर झाली आहे. त्याचा ताबा पत्र १७ जुलै २०२२ रोजी दिवंगत लक्ष्मी प्रभू पेणकर यांचे नावे देण्यात आले आहे. मात्र, या सदनिकेत मनोज परेलकर या व्यक्तीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने घुसखोरी केली आहे. सदनिकेचा ताबा मिळावा यासाठी पेणकर यांचे पत्रकार जावई संजय शिंदे व मुलगी सुषमा पेणकर-शिंदे पाठपुरावा करत आहेत. यासाठी त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात तक्रार दाखल केली. २०२२ सालापासून प्राधिकरणात हेलपाटे घालत आहेत. मात्र, प्राधिकरणाचे अधिकारी चालढकल करत आहेत. ५ मार्च २०२५ मध्ये उप जिल्हाधिकारी वंदना गेवराईकर यांच्याकडे सुनावणी झाली. त्यावेळी खूप सुनावण्या झाल्या आहेत. आता फाइल बंद करून निर्णय दिला जाईल, असे त्यांनी तोंडी सांगितले. या सुनावणीस दीड महिना लोटून गेला तरीही अद्याप निर्णय न झाल्याने पत्रकार संजय शिंदे यांनी अनेकदा गेवराईकर यांच्या कार्यालयात पाठपुरावा केला. यानंतरही संबंधित कार्यालयातून काहीच निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

सुनावणीची मालिका

एसआरए मुख्याधिकारी यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणी पहिली सुनावणी २०२३ मध्ये उप जिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके यांच्या दालनात दोनदा घेण्यात आली. त्यानंतर अनेकदा पाठपुरावा केल्यावर २०२४ मध्ये उप जिल्हाधिकारी औदुंबर पाटील यांच्याकडे तीनदा सुनावणी घेण्यात आली. ५ मार्च २०२५ मध्ये उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर यांच्याकडे सुनावणी झाली.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत