गिरीश चित्रे/ मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यांच्या मजबुतीकरणासाठी अमेरिकन जिओपॉलिमर अस्तराचे खंदकविरहित तंत्रज्ञानाचा भारतात पहिल्यांदा वापर करण्यात येणार आहे. यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांचे आयुर्मान ५० वर्षांनी वाढणार असून पावसाळ्यात अतिवृष्टीत पाण्याचा निचरा वेगाने होईल, असा विश्वास पर्जन्य जलवाहिनी विभागाने व्यक्त केला आहे.
हे तंत्रज्ञान वापरायला आयआयटी, मुंबई, व्हीजेटीआय अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर जिओपॉलिमर अस्तराचे खंडकविरहित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
शहर विभागात ४९५ किमी लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्या आहेत. तसेच पूर्व उपनगरांत आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी ६३ किमी, असे एकूण ६२१ किलोमीटर लांबीच्या कमानी/ बंदिस्त पर्जन्य जलवाहिन्या आहेत. मुंबईला लागून अरबी समुद्र आणि खाडी परिसर आहे. कमानी/बंदिस्त पर्जन्य जलवाहिन्या प्रणालीमधून पावसाचे पाणी समुद्रात सोडले जाते. मात्र समुद्राच्या भरतीओहोटीचा त्यावर परिणाम होत असतो. भरतीच्या वेळी या जलवाहिन्यांमधून पाणी आत येते व शहरात काही ठिकाणी पूर येतात. त्यादृष्टीने या वाहिन्या मजबूत करणे आवश्यक आहे.
शहर विभागात दुरुस्ती आवश्यक असलेल्या कमानी/बंदिस्त जलवाहिन्यांची डागडुजी सुरू आहे. सध्या १४ किमी अंतरावरील जलवाहिन्यांचे अस्तरीकरण करण्यात येत आहे.
मुंबई शहर परिसरात भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्या अस्तित्वात आहेत. त्याची साफसफाई / त्यातून गाळ काढण्याचे काम नियमितपणे केले जाते. जुन्या झालेल्या कमानी पर्जन्य जलवाहिन्यांच्या काही भागांमध्ये अनेक भेगा आढळल्या होत्या व विटा निखळल्या होत्या. काही ठिकाणी छताचा भागही कोसळला आहे. सीसीटीव्ही सर्वेक्षणात हे दोष दिसून आले होते.
त्यात २३ हजार ५४८ मीटर लांबीच्या ५६ कमानी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये दोष आढळला. यापैकी १४ हजार२८५ मीटर लांबीच्या २७ कमानी पर्जन्य जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. पहिल्या टप्प्यात ही दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे.
महापालिकेच्या प्रचलन व परिरक्षण विभागाने याबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) (आयआयटी मुंबई) आणि वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) या दोन्ही संस्थांशी चर्चा केली. या दोन्ही संस्थांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीची नोव्हेंबर २०२२ मध्ये बैठक घेण्यात आली. समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सध्या उपलब्ध असलेल्या सर्व तंत्रज्ञानामध्ये कमानी पर्जन्य जलवाहिन्यांच्या पुनर्वसनासाठी जिओपॉलिमर अस्तर खंदकरहित तंत्रज्ञानाद्वारे डागडुजी करण्यात येत आहे.
या अस्तरिकरण कामाची नुकतीच उपायुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता सुनीलदत्त रसाळ, कार्यकारी अभियंता मिलिंद व्हटकर, प्रशांत रणसुरे, मधुसूदन सोनवणे आदींनी शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाजवळील शांतिनिकेतन पर्जन्य जल पातमुख (आऊटफॉल) जवळ पाहणी केली.
पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट
गेल्या काही वर्षांत हवामान बदलांमुळे मुंबईत पावसाळ्यात काही तासांत १ हजार मिमी पाऊस कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान
सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या २७ भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे (१४,२८५ मीटर लांबी) पुनर्वसन करण्यात येत आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक असल्याची माहिती प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ, उपप्रमुख अभियंता सुनीलदत्त रसाळ यांनी दिली.