मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जवळ आणणारा आणि पश्चिम व पूर्व उपनगर जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड टप्पा ४ साठी मुंबई महापालिकेने १ हजार २९३ कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे मुंबई पूर्व-पश्चिम अधिक मजबुतीने जोडले जाणार असून या दोन्ही मार्गावरील तसेच नाहूर-ऐरोली टोल नाका जंक्शनवरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड टप्पा ४ हा सध्याच्या आणि भविष्यातील दोन्ही वाहतूक समस्यांवर उपाय करणारा महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग व आजूबाजूच्या जंक्शनवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी हा प्रकल्प तत्काळ तसेच दीर्घकालीन उपाय म्हणून आवश्यक असून त्यामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील जुळ्या बोगद्यांच्या सुरुवातीनंतर हा मार्ग समृद्धी महामार्ग तसेच एमएमआरडीएच्या प्रस्तावित कटाई नाका–ऐरोली फ्रीवेला हा प्रकल्प जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वाहनचालकांचा वेळ, पैसा आणि इंधनाचीही बचत होणार आहे.
असा होणार आहे प्रकल्प
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड टप्पा ४ प्रकल्प दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. टप्पा १ अंतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गावरील विद्यमान उड्डाणपुलावर दुसऱ्या स्तरावरील केबल-स्टेड उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाची एकूण लांबी १३३० मीटर असून त्यात २७० मीटर लांबीचे रॅम्प समाविष्ट आहेत. महामार्ग क्रॉसिंगसाठी १८० मीटर लांबीचा अनिवार्य स्पॅन असून, त्याची रुंदी ४०.६ मीटर (५+५ लेन) आहे, तर उर्वरित भागासाठी २४.४ मीटर रुंदीचा (३+३ लेन) व्हायाडक्ट प्रस्तावित आहे. तत्काळ दिलासा देण्यासाठी चारही कोपऱ्यांवर तात्पुरते ॲट-ग्रेड मोकळे डावे वळण तसेच नाहूर ते ऐरोली टोल नाका दरम्यान १६०० मीटर लांबीच्या विद्यमान जमिनीच्या पातळीवरील रस्त्यांचे सुधारकाम करण्यात येणार आहे.
टप्पा २ अंतर्गत कामे
टप्पा २ अंतर्गत चारही कोपऱ्यांवर क्लोव्हरलीफ लूप्स किंवा इंटरचेंज उभारण्यात येणार असून, रॅम्पसह एकूण २४०० मीटर लांबीचे काम केले जाणार आहे. याशिवाय ३६०० मीटर लांबीचे कायमस्वरूपी ॲट-ग्रेड मोकळे डावे बायपास रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.