मुंबई

मुंबई ते नवी मुंबई प्रवासासाठी १३,००० रुपये भाडं? दिल्लीमार्गे जाणाऱ्या विमानाचे तिकीट पाहून नेटकऱ्यांमध्ये हशा

मुंबई ते नवी मुंबई विमानतळासाठी दिल्लीमार्गे चालणाऱ्या फ्लाइट्सची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस पडला आहे. अवघ्या ३५ किमी अंतरासाठी १३ हजार रुपयांच्या तिकिटामुळे नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mayuri Gawade

डिसेंबर २०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून तेथे पोहोचण्याच्या अडचणींवर सातत्याने चर्चा सुरू आहे. वीक कनेक्टिव्हिटी, वाढलेला प्रवासखर्च आणि वाहतुकीची कोंडी यामुळे प्रवाशांचा संयमाची परीक्षा होत आहे. अशातच आता मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांदरम्यान दिल्लीमार्गे चालणाऱ्या विमानसेवेची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर हास्याचा स्फोट झाला आहे.

विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील अंतर अवघं ३५.९ किलोमीटर आहे. तरीही या प्रवासासाठी दिल्लीमार्गे उड्डाण आणि त्यासाठी तब्बल १३ हजार रुपयांहून अधिक खर्च होत असल्याने नेटकऱ्यांनी या प्रकारावर विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

इन्स्टाग्रामवरील ‘its shayan lol’ या अकाउंटवरून यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. “मुंबई ते नवी मुंबई जाण्यासाठी ३०० रुपये खर्च करायलाही लोक विचार करतात, मग १३ हजार रुपये देऊन विमानप्रवास कोण करणार?” असा टोला त्यात लगावण्यात आला. “ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांनी हा पर्याय वापरावा. मुंबई ते नवी मुंबई प्रवासात दिल्लीची छोटी ट्रिपही होईल,” असा उपरोधिक उल्लेखही करण्यात आला.

कोणती उड्डाणे सुरू आहेत?

IXIGO.com वरील माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसची दिल्लीमार्गे मुंबई ते नवी मुंबई अशी चार उड्डाणे उपलब्ध आहेत.

त्यापैकी IX १६७१ हे विमान मुंबईहून सायंकाळी ४.४५ वाजता सुटते आणि दिल्लीला ७.०५ वाजता पोहोचते. त्यानंतर तब्बल १५ तास २० मिनिटांचा लेओव्हर आहे. पुढील सकाळी ६ वाजता कनेक्टिंग फ्लाइट सुटते आणि सकाळी ८ वाजता नवी मुंबईत पोहोचते. या तिकिटाची किंमत सुमारे १३ हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरं IX १०५० हे विमान दुपारी २.५५ वाजता मुंबईहून सुटून दिल्लीला ५.१० वाजता पोहोचतं. त्यानंतर १ तास १५ मिनिटांच्या लेओव्हरनंतर IX १०८० हे विमान सायंकाळी ६.२५ वाजता दिल्लीहून सुटतं आणि रात्री ८.५० वाजता नवी मुंबईत पोहोचतं.

नवी मुंबईहून मुंबईकडे जाणाऱ्या IX २१५३ या विमानसेवेअंतर्गत विमान रात्री ८.२५ वाजता नवी मुंबईहून सुटून दिल्लीला १०.३५ वाजता पोहोचतं. त्यानंतर ५० मिनिटांच्या लेओव्हरनंतर IX १२३५ हे विमान रात्री ११.२५ वाजता दिल्लीहून सुटून मुंबईत पहाटे १.५० वाजता पोहोचतं.

तर IX १४६४ हे विमान सकाळी ८.४५ वाजता नवी मुंबईहून सुटून दिल्लीला १०.४५ वाजता पोहोचतं. त्यानंतर ७ तास २५ मिनिटांच्या लेओव्हरनंतर संध्याकाळी ६.१० वाजता दिल्लीहून उड्डाण होतं आणि रात्री ८.३० वाजता मुंबईत आगमन होतं.

सोशल मीडियावर मीम्स आणि विनोद

या विचित्र विमानमार्गांवरून सोशल मीडियावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “मानखुर्दचा ट्रॅफिक टाळण्यासाठी हा पर्याय आहे,” अशी एकाने टिप्पणी केली. तर दुसऱ्या एका युजरने, “पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नाही ना?” असा उपरोधिक सवाल करत या लांबलचक प्रवासाची खिल्ली उडवली.

“मानखुर्द ते वाशी ट्रॅफिक खूप असतं, म्हणून सरकारने अशी फ्लाइट सुरू केली असावी,” अशी प्रतिक्रिया आणखी एका नेटकऱ्याने दिली. तर एका युजरने, “आणखी ५ हजार रुपये वाढवले तर दुबईलाही जाऊन याल,” असा टोला लगावला.

Kerala : अखेर मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला; व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब, काँग्रेसचा मोठा निर्णय

आपटा रेल्वे स्थानक बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन; सीएसएमटीनंतर सर्वाधिक पसंती; मध्य रेल्वेला ८५ लाखांचा महसूल

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर होणार कारवाई; दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना

पास विद्यार्थांपेक्षा जागा अधिक; अकरावीसाठी मुंबईत ४ लाख ७६ हजार जागा, ठाण्यात १ लाख ६० हजार जागा उपलब्ध

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण, पुण्याच्या बुधवार पेठेत लॉज चालवणाऱ्याला दणका