मुंबई

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

क्रिकेटप्रेमींना वेस्टर्न रेल्वेच्या चर्चगेट आणि मरीन लाइन्स स्थानकांद्वारे वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचता येईल. याशिवाय...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवार, ५ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक सूचना जारी केली आहे. सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी दक्षिण मुंबईत येण्याची शक्यता असल्याने मरीन ड्राइव्ह आणि आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असून प्रेक्षकांसाठी प्रवेशद्वार दुपारी ४ वाजता उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे सामन्याच्या आधीच मोठ्या संख्येने प्रेक्षक वानखेडे परिसरात पोहोचतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी एक्स (X) वर पोस्ट करत नागरिकांना प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वानखेडे स्टेडियम, मरीन ड्राइव्ह आणि आसपासच्या मार्गांवर संध्याकाळच्या वेळी वाहतुकीचा वेग कमी होण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

प्रवाशांना सहकार्याचे आवाहन

दक्षिण मुंबईतून संध्याकाळच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी संभाव्य विलंब लक्षात घेऊनच प्रवास करावा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तसेच या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी रस्त्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, आधीच नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर केल्यास या व्यस्त मार्गावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकते.

सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन

रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रेक्षकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

क्रिकेटप्रेमींना वेस्टर्न रेल्वेच्या चर्चगेट आणि मरीन लाइन्स स्थानकांद्वारे वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचता येईल. याशिवाय मुंबई मेट्रो लाईन-३ (अक्वा लाईन) चर्चगेट स्थानकाशी जोडलेली असल्याने प्रवाशांसाठी हा आणखी एक सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी सूचना

मुंबई वाहतूक पोलिसांनी वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशासाठी सूचना जारी केल्या आहेत.

  • गेट १, २ आणि ७ : चर्चगेट रेल्वे स्थानक किंवा चर्चगेट मेट्रो स्थानकावर उतरून E रोड मार्गे प्रवेश करता येईल.

  • गेट ३ आणि ४ : मरीन लाइन्स रेल्वे स्थानकावर उतरून महर्षी कर्वे मार्गावरील रूपकला शोरूमजवळील पादचारी पूल वापरावा.

  • गेट ५ आणि ६ : चर्चगेट रेल्वे स्थानक किंवा चर्चगेट मेट्रो स्थानकावर उतरून महर्षी कर्वे मार्गावरील आयकर कार्यालयासमोरील पादचारी पूल वापरावा.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

वरातीमधील डीजेच्या कर्कश आवाजामुळे १४० कोंबड्या मृत्युमुखी; कुक्कुटपालन व्यावसायिकाची पोलिसांकडे तक्रार दाखल