मुंबई : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह फोर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील दीड लाखाहून अधिक स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखेतील ५७७ स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत हे भूषवणार आहेत. या दीक्षान्त समारंभाला भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून दीक्षान्तपर भाषण करतील. समारंभाचे अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित राहणार आहेत तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमासाठी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
विशेष प्रावीण्यासाठी पदके
ज्या विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदविकांसाठी स्वतःची पात्रता सिद्ध केलेली आहे त्यांना पदवी प्रदान करण्यासाठी या दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी २५६, वाणिज्य व व्यवस्थापन १४४, मानव्यविज्ञान विद्याशाखेसाठी १०६ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी ७१ एवढ्या पदव्यांची संख्या आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १९ विद्यार्थ्यांना २१ पदके मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये १२ मुली व ७ मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर २ स्पर्धा पारितोषिकेही यावेळी प्रदान करण्यात येणार आहेत.