मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडीचे दालन खुले; PHD अभ्यासक्रमाला विद्या परिषदेची मंजुरी 
मुंबई

मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडीचे दालन खुले; PHD अभ्यासक्रमाला विद्या परिषदेची मंजुरी

उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडी अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडी अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परदेशी विद्यार्थ्यांना संशोधनाच्या उच्च शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. विद्यार्थी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘सिंगल विंडो सिस्टीम’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया आधीच सुलभ करण्यात आली असून आता पीएचडी अभ्यासक्रमाचा समावेश केल्यामुळे या उपक्रमाला अधिक बळकटी मिळाली आहे. यामुळे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांप्रमाणेच संशोधन क्षेत्रातही परदेशी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.

दरवर्षी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून संशोधन क्षेत्रातही त्यांचा कल वाढताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स ( आयसीसीआर) यांनीही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडी अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर, मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याना मुंबई विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभागात पीएचडी अभ्यासक्रमाला प्रविष्ट होता येईल.

सर्व सुविधा एकाच ठिकाणी

‘सिंगल विंडो सिस्टीम’ या प्रणालीद्वारे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांची तपासणी, पात्रता निश्चिती, महाविद्यालये व विभागांचे वाटप तसेच व्हिसा आणि एफएफआरआरओ संबंधित मार्गदर्शन यांसारख्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी कमी होऊन अधिक पारदर्शक आणि वेगवान प्रक्रिया अनुभवता येणार आहे.

अंतिम निवड ऑनलाइन मुलाखतीने होणार

विद्यापीठातील पीएचडी अभ्यासक्रमासाठी पात्रता निकषांनुसार संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी आवश्यक आहे तसेच प्रवेश/रीसर्च अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असून अंतिम निवड ऑनलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

सर्वसमावेशक अभ्यासक्रम

पीएचडी अभ्यासक्रमाची रचना सर्वसमावेशक असून त्यामध्ये ऑनलाइन प्रवेश/रीसर्च अॅप्टिट्यूड टेस्ट, ऑनलाइन मुलाखत, अभ्यासक्रम (कोर्स वर्क), सखोल संशोधन कार्य, प्रत्येक सहा महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणे, सादरीकरणे, संशोधन प्रकाशने, सिनॉप्सिस सादर करणे, प्रबंध (थिसिस) सादर करणे आणि व्हायवा-व्होसे (मौखिक परीक्षा) यांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठ ‘ग्लोबल रिसर्च डेस्टिनेशन’ बनविण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलत आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू करणे हा त्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्या परिषदेच्या या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाची जागतिक शैक्षणिक ओळख अधिक दृढ होणार असून विविध देशांतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संशोधन करण्याचे दालन विद्यापीठात खुले होणार आहे.
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई