युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, संग्रहित छायाचित्र एक्स @Adnyatvasi
मुंबई

पैकीच्या पैकी! मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेनेचाच झेंडा; ‘अभाविप’ला धूळ चारत सर्व १० जागा जिंकल्या

गेले काही महिने चर्चेत राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार १० पैकी १० जागा पटकावत सिनेटवर झेंडा फडकवला

Swapnil S

मुंबई : गेले काही महिने चर्चेत राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार १० पैकी १० जागा पटकावत सिनेटवर झेंडा फडकवला आहे. अपक्ष आणि भाजपपुरस्कृत ‘अभाविप’च्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारत युवा सेनेने सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.

यंदाची मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक चर्चेत राहिली आहे. सिनेट निवडणूक २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे ही निवडणूक लांबणीवर गेली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदारांची नोदणी करण्यात आली. त्यानुसार राज्य सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२)(न) नुसार सिनेटवर १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात उतरले होते. तसेच या निवडणूकीत एकूण १३,४०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. मात्र, राज्य सरकारने मतदान तोंडावर आले असताना निवडणुकीला तात्पुरती स्थगिती दिली. याविरोधात युवा सेनेने न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने निवडणुकीवरील स्थगिती उठवत २४ सप्टेंबर रोजी मतदान आणि २७ सप्टेंबरला मतमोजणी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार २४ सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडली. मतमोजणीला स्थगिती देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने कोर्टात धाव घेतली होती. मात्र, मतदान मोजणीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली.

...विजय ही सुरुवात - आदित्य ठाकरे

सिनेट निवडणूक होऊ नये म्हणून महायुती सरकारने अनेक षडयंत्रे रचली. मात्र शुक्रवारी सिनेट निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेना युवा सेनेला भरघोस मतांनी विजय मिळाला. सिनेट निवडणुकीचा निकाल म्हणजे विधानसभा विजयाची सुरुवात आहे, अशा शब्दांत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीला ठणकावले. निवडणूक झाली तर पराभव हा निश्चित, ही भीती महायुतीला सतावत असल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती घेत नाही. मिंधेंकडून निवडणूक थांबवण्याचे प्रयत्न होत होते, पण मी कोर्टाचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.

सिनेट निवडणुकीत राखीव मतदारसंघातील युवा सेनेचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले. राखीव मतदारसंघातून ‘डीटीएनटी’ प्रवर्गातून युवा सेनेचे शशिकांत झोरे यांना ५ हजार १७० तर ‘अभाविप’च्या अजिंक्य जाधव यांना १ हजार ६६मते मिळाली. एसी प्रवर्गातून शीतल देवरूखकर यांना ५ हजार ४९८, तर राजेंद्र सयगावकर १ हजार ०१४ मते, एसटी प्रवर्गातून धनराज कोहचाडे यांना ५ हजार २४७, तर निशा सावरा ९२४, ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ (युवा सेना) यांना ५ हजार ३५०, तर राजेश भुजबळ (अभाविप) यांना ८८८ मते मिळाली.

तसेच महिला प्रवर्गातून युवा सेनेच्या स्नेहा गवळी यांना ५ हजार ०१४ मते, तर ‘अभाविप’च्या रेणुका ठाकूर यांना ८८३ मते मिळाली. तसेच युवा सेनेचे खुल्या गटातील उमेदवार प्रदीप सावंत हे पहिल्या पसंतीचे १ हजार ३३८ हून अधिक मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. तर मिलिंद साटम १ हजार २४६ मते घेऊन विजयी झाले. अल्पेश भोईर हे १ हजार १३७ मते घेऊन विजयी झाले. तर परम यादव यांनीही विजय मिळवला.

सिनेट निवडणुकीत नेहमीच युवा सेनेचे वर्चस्व

यापूर्वी, मुंबई विद्यापीठाच्या २०१० च्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेने १० पैकी ८ जागा जिंकल्या होत्या, तर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत युवा सेनेने सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात