मुंबई

Mumbai : प्रशासकीय सुधारणा गुणांकनात मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल; ९ निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी

राज्य शासनाने राबवलेल्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यापीठाला एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक ८० गुण मिळाले आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्य शासनाकडून प्रजासत्ताक दिनी राज्यातील विविध कार्यालयांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामधील प्रशासकीय सुधारणा निकषात राज्यातील एकूण १३ अकृषी विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठ अव्वल ठरले आहे. राज्य शासनाने राबवलेल्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यापीठाला एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक ८० गुण मिळाले आहेत.

विकसित महाराष्ट्र २०४७ कडे वाटचाल करत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनातर्फे प्रशासकीय सुधारणाअंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था, इ. आस्थापनामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला होता.

९ निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी

विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने शासनाच्या मूल्यांकनाच्या एकूण ९ निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम, सर्व संवर्गाची अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळसेवा नियुक्ती रिक्त पद स्थिती, बिंदू नामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, आयजीओटी नोंदणी व प्रशिक्षण आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटल करणे अशा सर्व निकषांत मुंबई विद्यापीठाचे मूल्यमापन करून ८० गुण बहाल करण्यात आले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचा सन्मान

६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबवण्यात आला होता. राज्य शासनातर्फे राबवण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठ प्रशासनावतीने मानव संसाधन विकास विभागाचे उपकुलसचिव डॉ. अशोक फर्डे आणि त्यांच्या चमूने या उद्दिष्टपूर्तींसाठी विशेष परीश्रम घेतले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय विभागांचा राज्य शासनातर्फे लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.

शिंदे गटाला मोठा धक्का; म्हसळा नगरपंचायतीतील सात नगरसेवक अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने खळबळ

जिल्हा परिषद निवडणूक : NCP उमेदवाराच्या अर्जाला विरोध करणाऱ्या BJP उमेदवाराला HC चा दणका; एक लाखाचा दंड, याचिकाही फेटाळली

Thane : महापौरपद नाही तर उपमहापौरपदही नको; भाजपची भूमिका स्पष्ट

Navi Mumbai : वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी निलंबित; ४ दिवसांपूर्वीच पोलीस नियंत्रण कक्षात झाली होती बदली

Mumbai : भाजप व शिंदे सेनेची मदार दादांच्या तीन नगरसेवकांवर; दोन्ही पक्षनेतृत्वाकडून मोर्चेबांधणी