मुंबई : दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईत आगींच्या घटनांचे सत्र सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या अपुऱ्या साधनसामग्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्याविहार येथील दहा मजली इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला चक्क लगतच्या जॉली जिमखान्यातील स्विमिंग पूलमधील पाण्याचा वापर करावा लागला. लेव्हल-२ ची आग घोषित झाल्यानंतर घटनास्थळी सहा ते आठ पाण्याचे टँकर आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ चार टँकर उपलब्ध झाले. त्यामुळे अग्निशमन दलाला पर्यायी व्यवस्था करावी लागली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन ते तीन तासांत आग आटोक्यात आणली. मुंबईत ३६ अग्निशमन केंद्रे असताना अवघे २२ पाण्याचे टँकर आणि ४२ फायर इंजिन उपलब्ध असल्याची बाब या घटनेने उघड झाली आहे.
विद्याविहार येथील जॉली जिमखान्याजवळील स्कायलाइन विदा या दहा मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आग सातव्या मजल्यापर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान फायर इंजिन आणि चार पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन लेव्हल-२ घोषित करण्यात आली. या स्तरावरील आगीसाठी साधारणतः सहा ते आठ पाण्याचे टँकर आवश्यक असतात. मात्र, उपलब्ध टँकरची संख्या कमी असल्याने अग्निशमन दलासमोर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला इमारतीतील अग्निशमन यंत्रणा आणि उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात आला. मात्र, भाग विझवण्यासाठी आणखी पाण्याची आवश्यकता असल्याने अखेर बाजूलाच असलेल्या जॉली जिमखान्यातील स्विमिंग पूलमधील पाणी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाण्याच्या मदतीने जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या साधनसामग्रीत तातडीने वाढ करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
डोंगरीतही फटाक्यांमुळे आग लागल्याचा संशय
डोंगरी येथील डॉ. महेश्वरी रोडवरील हाजी कसम चाळीजवळ रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे ५० ते ६० हजार चौरस फुटांच्या परिसरात साठवलेल्या लाकडी फर्निचर, केमिकलचे ड्रम आणि अन्य साहित्याने पेट घेतला. या आगीत १० ते १२ सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती आहे. ही आगही फटाक्यांमुळे लागली असावी, असा संशय स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे
३६ अग्निशमन केंद्रांवर पाण्यासाठी ताण
मुंबईत ३६ अग्निशमन केंद्रे असून संपूर्ण शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी ४२ फायर इंजिन आणि अवघ्या २२ पाण्याच्या टँकरवर आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात एकाच वेळी अनेक ठिकाणी आगी लागल्यास उपलब्ध यंत्रणेवर किती ताण येतो, हे विद्याविहारमधील घटनेने स्पष्ट केले आहे. प्रत्येक अग्निशमन केंद्रात किमान दोन फायर इंजिनांसह अतिरिक्त पाण्याचे टँकर उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे मत अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.
संपूर्ण यंत्रणा व्यग्र
रविवारी मुंबईत अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने अग्निशमन दलाची संपूर्ण यंत्रणा व्यग्र होती. विद्याविहार येथील आगीची तीव्रता लक्षात घेता अधिक पाण्याचे टँकर उपलब्ध असणे आवश्यक होते. मात्र, घटनास्थळी चारच टँकर असल्याने अतिरिक्त पाण्यासाठी स्विमिंग पूलमधील पाण्याचा वापर करण्यात आला. ही आग रॉकेट उडवल्यानंतर ते इमारतीच्या गच्चीवर पडल्याने लागली असावी. गच्चीवरील काही मशिनरींना आग लागून ती पसरल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.