मुंबई : जाचक अटींमुळे मुंबईतील टँकरचालकांनी दोन दिवसांपासून संपाचे हत्यार उपसले आहे. टँकरचालकांच्या संपाचा फटका मुंबईतील पाणीपुरवठ्याला बसत असून संपावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर टँकरचालकांची बैठक झाली. यात तोडगा निघाला नसल्याने टँकरचालकांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगी टँकरचालकांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पाण्याची समस्या आणखी वाढली आहे. चेंबूर, मालाड, कांदिवली आणि चांदिवली येथे तीव्र टंचाई निर्माण झाली. या भागातील रहिवाशांना मुंबई मनपाकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी टँकर बॅकअप नव्हता. दरम्यान अंधेरी, शिवडी आणि सायन येथे सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईतील विहिरी, बोअरवेल मधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने भूजल पातळी घटते आहे. यावर नियंत्रणासाठी विहिरी मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक केली आहे. यातील काही जाचक अटींविरोधात १० एप्रिलपासून मुंबईतील सुमारे २ हजार खासगी टँकर चालक संपावर गेले आहेत. मुंबईतील व्यापारी संकुले, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, इमारत बांधकामे तसेच विविध विकास कामांसाठी खासगी टँकर चालकांकडून रोज ३०० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. मात्र दोन दिवसांपासून हा पाणी पुरवठा झालेला नाही. याचा परिणाम विविध प्रकल्प, व्यापारी संकुले आदींवर होणार आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विहिरी मालकांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
आदेशाला स्थगिती तरी संप कायम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला या विषयावर तातडीने तोडगा काढण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेने याबाबत काढलेल्या आदेशाला १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती दिली आहे. विहीर व कूपनलिकांसाठी तसेच भू-जल उपशासाठी आवश्यक त्या सर्व परवानगी प्राप्त करणे बंधनकारक राहील, असेही प्रशासनाने म्हटले आहे. परिणामी तात्पुरती स्थगिती नको तर अटी व शर्ती पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करत टँकर चालकांनी संपावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला आहे.