मुंबई : ‘अल निनो’मुळे यंदा पाऊस कमी पडणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असून विविध धरणांतील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पुढील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी १ मे पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सातही धरणात ३३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून तो ७ जुलैपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतका आहे.
धरणांतील पाण्याचे होतेय बाष्पीभवन...
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. त्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना योग्यरित्या पाणीपुरवठा करता यावा यासाठी नियोजनाचा भाग म्हणून १ मे पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता
साधारणत: ७ जून पर्यंत वरुणराजाचे आगमन होते. मात्र वातावरणीय बदलांमुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑगस्टपर्यंत मुंबईकरांना योग्यरित्या पाणीपुरवठा करता यावा यासाठी नियोजनाचा भाग म्हणून १ मे पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. आयुक्तांची लवकरच मंजुरी मिळाल्यानंतर पाणी कपात १मे पासून लागू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
धरणांमध्ये ७ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ७ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. दरवर्षी मान्सूनचा अंदाज लक्षात घेऊन जुलैपर्यंत पाणी नियोजन केले जाते. मात्र, यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे राज्य सरकारने ऑगस्टपर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे १ मेपासून १० टक्के कपात केल्यासच ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
धरणांतील विद्यमान पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा - ७७,०४५
मोडक सागर - ४५,३४०
तानसा - ४०, ८१७
मध्य वैतरणा - ६९,१०६
भातसा - २,३५,४३९
विहार - १५,३५३
तुळशी - ३,२७४
तीन वर्षांतील पाणीसाठा - टक्के
२०२६ - ४,८६,३७५ - ३३.६०
२०२५ - ४,३७,७२८ - ३०.२४
२०२४ - ३,५५,१७७ - २४.५४
अर्ध्या तासाचा 'पॉवर कट' पडला भारी
मुंबईत सध्या उन्हाचा पारा चढलाय, घामाच्या धारा वाहत आहेत आणि अशातच मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवणारी एक बातमी बुधवारी पुढे आली. पडघा वीज उपकेंद्रात झालेल्या एका तांत्रिक बिघाडाने अख्ख्या मुंबईकरांना संकटात टाकले. पिसे आणि पांजरापूर ही महत्त्वाची जलशुद्धीकरण केंद्रे वीज नसल्याने ठप्प झाली आणि बघता बघता मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे गणितच बिघडले. आता या तांत्रिक घोळामुळे पालिकेला शहरात अचानक २० ते २५ टक्के पाणीकपात लागू करावी लागली. याचा मोठा फटका गिरगाव आणि खार दांडा परिसरातील रहिवाशांना बसला.