मुंबई : वरुणराजाची प्रतीक्षा करता करता जून महिना संपायला आला. मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. ना मुंबईत ना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात वरुणराजाची कृपादृष्टी. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा तळ गाठत असून फक्त ७ टक्केच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
जून जवळपास संपत आला. त्यामुळे जून महिन्यात ४०० मिमी पाऊस बरसेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रातही पाठ फिरवली. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील साठ्याने तळ गाठला आहे.
२७ जूनला पाणीसाठा (टक्केवारीत)
अप्पर वैतरणा - 0
मोडक सागर १८.८७
तानसा - ०.७७
मध्य वैतरणा ११.३१
भातसा ६.१७
विहार - ४५.१३
तुळशी - २१.३१
२७ जून रोजीचा साठा धरणांतील तीन वर्षांतील पाणीसाठा (टक्केवारीत)
२०२६ - ७.३१ टक्के
२०२५ - ३७.१६ टक्के
२०२४ - ५.२९ टक्के
मुंबईकरांना दररोज लागते ४,१०० दशलक्ष लिटर पाणी
मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते.
पाणीकपात वाढणार ?
सध्या सातही धरणांत २७ जून रोजी १ लाख ५ हजार ७५५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र एल नीनोचा प्रभाव असल्याने यंदा पाऊस किती व कधी पडेल याचा अंदाज नाही. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन म्हणून पाणी कपातीत १ जुलैपासून आणखी १० टक्के अशी २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरू
मुंबईत पावसाची ओढ कायम असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात पावसाची कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असून राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरू केला आहे.