स्टेशन मास्तरांची जबाबदारी आता केवळ गाड्यांची वेळ, प्रवाशांची व्यवस्था किंवा स्थानकाचे नियोजन यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता त्यांना स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांवरही नजर ठेवावी लागणार आहे. मुंबई लोकल स्थानकांवर वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर (प्रभारी) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, स्थानक परिसर भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
प्रत्येक स्थानकासाठी नोडल अधिकारी
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित स्थानकाचे स्टेशन सुपरिटेंडंट किंवा स्टेशन मास्टर (प्रभारी) हेच नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. स्थानक परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त ठेवणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि यासंदर्भात स्थानिक महापालिकेशी समन्वय साधणे, ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
नियमित पाहणी आणि तातडीची कारवाई
नोडल अधिकाऱ्यांना स्थानक परिसराची नियमित पाहणी करावी लागणार आहे. भटके कुत्रे प्लॅटफॉर्म किंवा स्थानकात येऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार महापालिका आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने कारवाई करण्यात येईल. यासोबतच करण्यात आलेल्या कारवाईची नोंद ठेवून आवश्यकतेनुसार विभागीय कार्यालयाला अहवालही सादर करावा लागणार आहे.
तक्रार करण्याची सुविधा
प्रवाशांना कोणतीही अडचण आल्यास त्वरित तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक स्थानकावर संबंधित नोडल अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांबाबतची माहिती किंवा तक्रार थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे.
सुरक्षेला प्राधान्य
गेल्या काही वर्षांत रेल्वे स्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय ठरला होता. गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर किंवा प्रवेशद्वाराजवळ कुत्रे बसलेले असल्याने प्रवाशांना अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताची शक्यताही व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय, रेल्वे बोर्ड आणि पश्चिम रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, या निर्णयामुळे रेल्वे आणि महापालिकांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल, तक्रारींवर जलद कारवाई होईल आणि मुंबई लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी स्थानक परिसर अधिक सुरक्षित करण्यास मदत होईल.