"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...

आंदोलन करणारे पंतप्रधान मोदींना खूप शिवीगाळ करत होते आणि ते इतरांनाही तसं करायला सांगत होते....
"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...
"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर येथे सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती. यामुळे चर्चेत आलेल्या मुलीने व्हायरल व्हिडिओद्वारे देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागितली आहे. आपण इतरांच्या प्रभावाखाली ही चूक केली असून, "मी फक्त १५ वर्षांची आहे. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे," असे सांगत तिने दिलगिरी व्यक्त केली.

'माझ्याकडून चूक झाली’

४९ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये संबंधित मुलगी म्हणते, "मी माझ्या मित्रांबरोबर कनॉट प्लेसला गेले होते. तिथे आंदोलन करणारे पंतप्रधान मोदींना खूप शिवीगाळ करत होते आणि ते इतरांनाही तसं करायला सांगत होते. मी त्या लोकांच्या प्रभावाखाली आले. त्याबद्दल मी माफी मागते. मी फक्त १५ वर्षांची आहे. मी जे काही बोलले, ते माफीच्या लायकीचे नाही. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मी परत असं करणार नाही. मी संपूर्ण देशाची माफी मागते. मला स्वतःची इतकी लाज वाटतेय की मी स्वतःशीही नजर मिळवू शकत नाही. कृपया मला माफ करा."

आंदोलनानंतर मुलगी बेपत्ता असल्याची माहिती

वृत्तानुसार, ही मुलगी नोएडामधील एका गृहनिर्माण सोसायटीत आईसोबत राहत होती. आंदोलनानंतर संबंधित फ्लॅट कुलूपबंद असून ती अद्याप परतलेली नसल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने सोसायटीत जाऊन रहिवाशांकडून माहितीही घेतली आहे.

मोदींच्या व्हिडिओनंतर मुलीचा माफीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करण्याचे आणि त्यांना शिक्षा करण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन करणारा एक व्हिडीओ शुक्रवारी रात्री शेअर केला होता. त्यानंतर संबंधित मुलीने व्हिडिओमार्फत माफी मागितली.

'भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा देऊया'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, "मला तर शिवीगाळ केलीच पण माझ्या दिवंगत आईलाही अत्यंत गलिच्छ शिवीगाळ करण्यात आली, याचे दुःख झाले. मात्र, शिवीगाळ करून कोणतीही समस्या सुटत नाही. भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा देऊया," असे मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मला त्यांना माफ करायचे आहे. माणसांकडून चुका होतात. भरकटलेल्या आपल्या तरुणांना आपण माफ केले पाहिजे. ते शेवटी आपलीच मुले आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य आहे."

काँग्रेसकडून मोदींवर टीका

पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली. काँग्रेसचे माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, "देश त्यांच्याकडून माफीची अपेक्षा करत आहे, पण त्यांनी उलट देशालाच माफ केले."

नीट आंदोलनातून निर्माण झाला वाद

कथित नीट परीक्षेतील अनियमिततेविरोधात सीजेपीच्या नेतृत्वाखाली २० जूनपासून जंतरमंतर येथे आंदोलन सुरू होते. केंद्र सरकारसोबत तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याने हे आंदोलन २५ जुलै रोजी मागे घेण्यात आले.

या आंदोलनादरम्यान २० जुलै रोजी संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती.

आक्षेपार्ह घोषणाबाजीप्रकरणी झिरो एफआयआर

जंतरमंतर येथे २३ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलिस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलीविरोधात झिरो एफआयआर नोंदवण्यात आला होता.

एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या वक्तव्यामुळे पंतप्रधान या घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेचा अवमान झाला असून समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५३ (१) आणि ३५६ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा झिरो एफआयआर दिल्लीतील संसद मार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सीजेपीचा एफआयआरवर आक्षेप

दरम्यान, या एफआयआरवर आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आक्षेप नोंदवला आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी आक्षेपार्ह भाषेचे समर्थन करता येणार नाही, असे स्पष्ट करताना अशा वक्तव्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रतिकूल परिणाम करणारे ठरू शकते, असे मत व्यक्त केले. अशा प्रकरणात फौजदारी कारवाईऐवजी अब्रूनुकसानीचा (मानहानीचा) दावा हा अधिक योग्य कायदेशीर पर्याय ठरला असता, असेही त्यांनी म्हटले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in