मुंबई : ऊर्जा मंत्रालयाने परिकल्पित केलेला मुंबई ऊर्जा मार्ग हा आंतरराज्य पारेषण प्रणाली प्रकल्प आता औपचारिक उद्घाटनाच्या मार्गावर आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशाला २ हजार मेगावॉट अतिरिक्त वीज मिळणार आहे.
९० किमीचा पडघा-खारघर आंतरराज्य पारेषण मार्ग हा मुंबई ऊर्जा मार्ग म्हणून ओळखला जाणार असून स्टरलाइट पॉवरने याची निर्मिती केली आहे. मुंबई, महानगरासाठी हा वीज प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. हा प्रकल्प आता औपचारिक उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि महानगराला अविरत, अखंडित असा वीजपुरवठा प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहराच्या आर्थिक वृद्धीत तसेच लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असे या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
ऊर्जा मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या २१ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या ४१व्या बैठकीत मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ऊर्जा मंत्रालयाच्या ४२व्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. ६ ऑगस्ट २०१८ रोजी ऊर्जा मंत्रालयाच्या पारेषण लाईनच्या बैठकीतही या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत अल्ट्रा हायव्होल्टेज ट्रान्समिशन लाइन आणि वाहिन्यांच्या जमीन वापरासाठी सुधारित धोरण मंजूर करण्यात आले. धोरणातील बदलांमुळे मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या बांधकामाला लक्षणीय गती मिळाली. वीज पारेषण प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण कायदा मंजूर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्यानंतर अवघ्या २० महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण झाला.
प्रकल्पाला १२ वर्षे विलंब
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साप्ताहिक तसेच मासिक बैठका घेत, या प्रकल्पाचा आढावा घेतला तसेच तांत्रिक अडचणी सोडवत या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा केला. या प्रकल्पाला १२ वर्षे याआधीच विलंब झाला असून फडणवीस हे ऊर्जामंत्री झाल्यापासून त्यांनी या प्रकल्पात विशेष रस दाखवला. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पामुळे आता ग्रेटर मुंबईची विजेची वाढती मागणी पूर्ण होणार असून या भागाला अविरत, शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे.