मुंबई : भाडेतत्त्वावरील बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मुलुंड चेकनाक्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात जयश्री भानाजी परमार (५६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बसेसच्या वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वेट लीजवरील बसेसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मातेश्वरी कंपनीच्या मुलुंड आगारातील सी-५१२ क्रमांकाची बस (एच०१-ईएम-१८९१) नेरुळहून मुलुंड चेकनाका बस स्थानकाकडे जात होती. चेकनाक्यावरील वाहतूक सिग्नलजवळ बस थांबली असताना जयश्री भानाजी परमार ( ५६) या महिला रस्ता ओलांडत होत्या. सिग्नल हिरवा होताच चालकाने बस सुरू केली. त्याचवेळी महिलेचा बसच्या पुढील उजव्या कोपऱ्याला धक्का लागला. त्या रस्त्यावर पडताच बसचे उजवे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची सविस्तर चौकशी सुरू
या घटनेनंतर वाहकाने तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला जवळील एम टी अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी बस चालक रवी भगवान भोईसे (वय ३३) आणि वाहक शैलेश सुधाकर वाघ (वय २६) यांच्यासह संबंधित बस मुलुंड पोलिस ठाण्यात नेण्यात आली. चालक व वाहक मातेश्वरी बससेवेतील कर्मचारी आहेत.अपघाताची माहिती मिळताच बेस्टच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मुलुंड चेकनाका परिसरात झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांकडून अपघाताची सविस्तर चौकशी सुरू असून, नेमका अपघात कशामुळे झाला, याचा तपास करण्यात येत आहे.
कंत्राटदारांवर कठोर कारवाईची मागणी
गेल्या काही महिन्यांत भाडेतत्त्वावरील बेस्ट बसेसचे वारंवार अपघात होत असून अनेक प्रवासी व पादचारी यामध्ये बळी पडले किंवा जखमी झाले आहेत. तरीही चालकांचे प्रशिक्षण, देखरेख, सुरक्षितता नियमांची अंमलबजावणी आणि कंत्राटदारांवरील जबाबदारीबाबत प्रभावी पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे. या दुर्घटनेनंतर भाडेतत्त्वावरील बससेवेचे सुरक्षा लेखापरीक्षण, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई आणि अपघात रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.