डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे विशेष ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे रविवारी (दि.१०) संध्याकाळी दादर परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी ही विशेष वाहतूक व्यवस्था लागू केली आहे. याआधी हा ड्रोन शो १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता, मात्र ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाल्याने हा कार्यक्रम तात्पुरता रद्द करण्यात आला होता.
संध्याकाळी ५ ते १० दरम्यान निर्बंध
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत काही रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध लागू असतील. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
'हे' रस्ते राहणार बंद
शिवाजी पार्कजवळील केळुस्कर रोड साऊथ आणि केळुस्कर रोड नॉर्थ हे रस्ते सर्वसामान्य वाहनांसाठी बंद राहतील. या मार्गांवर फक्त निमंत्रित आणि अधिकृत वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच, सिद्धिविनायक जंक्शनकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रोडवरील येस बँक परिसराकडे जाणारी वाहतूकही मर्यादित करण्यात आली आहे.
एस. के. बोले रोडवर वन-वे व्यवस्था
एस. के. बोले रोडवर सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शनदरम्यान वन-वे वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
पश्चिम उपनगरांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी सिद्धिविनायक जंक्शनवरून एस. के. बोले रोडमार्गे गोखले रोड, गडकरी जंक्शन, एल. जे. रोड आणि राजा बढे चौक हा मार्ग वापरावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तर, दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी येस बँक जंक्शनवरून पांडुरंग नाईक रोड, राजा बढे चौक, एल. जे. रोड आणि गडकरी जंक्शनमार्गे पुढे जावे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
शिवाजी पार्क परिसरात संध्याकाळी अनावश्यक प्रवास टाळावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रविवारची गर्दी, कार्यक्रम आणि वाहतूक बदल यामुळे दादर परिसरात कोंडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी वेळेआधी घराबाहेर पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.