मुंबई : जून अखेरीस पावसाची दमदार इनिंग सुरू होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आता खरा ठरत आहे. गुरुवारी सकाळपासूनच जोरदार सरींसह पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी ढगाळ वातावरणानंतर मुंबई आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. संध्याकाळी काहीसा गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर चांगलेच सुखावले. दरम्यान, मुंबई व उपनगरांत येत्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रविवार, ९ जून रोजी मान्सूनने मुंबईत दमदार एन्ट्री केल्यानंतर संपूर्ण जून महिना मुंबईकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. अधूनमधून पावसाळी वातावरण निर्माण करून रिपरिप करीत अचानक गायब होणाऱ्या पावसाने गेले काही दिवस मुंबईला हुलकावणी दिली होती. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने चांगलेच त्रस्त झाले होते. हवामान विभागाचे पावसाचे अंदाजही अनेकवेळा फोल ठरले होते. त्यामुळे मुंबईकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते.
बुधवारी रात्रीपासून मुंबई व उपनगरांत पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही दिवसभर चांगल्या सरी कोसळल्या. मुंबईत हळूहळू पाऊस सक्रिय होत असल्याचे गुरुवारी दिसून आले. त्यामुळे मुंबईत पाऊस जोर धरतो आहे, असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, मुंबईत पुढील २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दिवसभरातील पावसाची नोंद
शहर - २९.२६ मिमी
पूर्व उपनगर - २४.३८ मिमी
पश्चिम उपनगर - १९.५८ मिमी