मुंबई : वांद्रे सी लिंक ते मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक दरम्यानचा मार्ग वाहतूक सोमवारपासून प्रवासी सेवेत दाखल झाला. पहिल्या दिवशी २२ हजारांहून वाहन धारकांनी कोस्टल रोडची सफर अनुभवली. यात दक्षिण दिशेला म्हणजे मरिन ड्राईव्हकडे २१,६३९ वाहनांनी तर उत्तर दिशेला म्हणजे दहिसरच्या दिशेने जाणा-या १५,५८३ वाहनांनी प्रवास केला.
मरीन ड्राईव्ह ते वांद्रे पर्यंत अवघ्या १५ मिनिटांत पोहचता येत आहे. त्यामुळे कोस्टल रोडवरून प्रवास सुसाट होत आहे. नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो. या प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण १२ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित दिशांकडे वाहतूक सोमवापासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी दक्षिण दिशेकडे म्हणजे वरळी, मरीन ड्राईव्हकडे २१६३९ वाहनांनी तर उत्तर दिशेला म्हणजे दहिसरच्या दिशेने जाणा-या १५५८३ वाहनांनी प्रवास केल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.