मुंबई : जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने नियमावली तयार केली असून या नियमावलीचे पालन भाविकांनी करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले असून भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले तरच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. हा ड्रेसकोड पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली.
सिद्धिविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरत आहे, अशा तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. त्यामुळेच सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्या पद्धतीचे मत मांडले होते. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. सिद्धिविनायक मंदिराचे पावित्र्य राखले जाईल आणि अन्य भाविकांना संकोच वाटणार नाही, असे कपडे परिधान करून यावे, असे आवाहन मंदिर न्यासाकडून करण्यात आले आहे. इतरांना संकोचल्यासारखे वाटेल किंवा तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ज्या महिला किंवा मुली शॉर्ट्स कपड्यांमध्ये येणार, त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे मंदिर न्यासाने पत्रात म्हटले आहे.
राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरांत गेल्या काही महिन्यांपासून ड्रेसकोड लागू करण्यात आले आहेत. देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना सर्वांचे अंग झाकलेले असावे, असा त्यामागील शुद्ध हेतू आहे. पण बऱ्याचदा अनेक भक्त आक्षेपार्ह असे पेहराव करून येतात, ज्यामुळे मंदिरात येणाऱ्या अन्य भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात येतो. त्याचमुळे महाराष्ट्रात तुळजाभवानी मंदिर, सप्तश्रृंगी मंदिर, सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिर या ठिकाणी काही वर्षांपासून ड्रेसकोड लागू करण्यात आलेला आहे. अशातच आता मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
सिद्धिविनायक मंदिर प्रवेशासाठी नियमावली
कट ऑफ जीन्स, स्कर्ट, तोकडे कपडे, अंगप्रदर्शन करणारे कपडे, अयोग्य पोशाख परिधान करणाऱ्यांना गणपतीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
मंदिरात अशोभनीय कपडे घालणे टाळावे. भारतीय परंपरेला साजेशा कपड्यांचा समावेश असावा.