मुंबई

महापरिनिर्वाण दिनासाठी महानगरपालिका सज्ज

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

अनुयायांकरिता जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, निरीक्षण मनोरे, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वच्छता, आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार या अनुषंगाने सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे अनुयायांसाठी देण्यात आलेल्या सेवासुविधांचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह संबंधित अधिकारी या पाहणीवेळी उपस्थित होते.

मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविधस्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये तात्पुरता निवारा, शामियाना, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यांसाठी ८ हजार अधिकारी -कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

अनुयायांच्या सुविधेकरिता यंदा जलप्रतिबंधक (वॉटरप्रूफ) मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादनाची व्यवस्था १८ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रात करण्यात आली आहे. तसेच जलफवारणी आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांनी दिली.

स्वच्छता राखण्यासाठी वाहने आणि कर्मचारी व्यवस्थाही करण्यात आली आहे. शौचालये आणि स्नानगृहांचीही व्यवस्था मैदान परिसरामध्ये करण्यात आली आहे. जवळपास ८ हजार मनुष्यबळ या सर्व सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी कार्यरत असते. त्यासोबतच महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या वैद्यकीय चिकित्सा सुविधेमध्ये ३ कक्ष उभारण्यात येणार आहेत. तसेच ११ रुग्णवाहिकांची उपलब्धताही करून देण्यात आली आहे. मैदान परिसरात अनुयायांच्या सुविधेसाठी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण वैद्यकीय आणि सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी मिळून ५८५ मनुष्यबळ यंदा कार्यरत असणार आहे. गतवर्षी एकूण १३ हजार ८२४ अनुयायांनी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांचा लाभ घेतला होता, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली.

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. या वर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन हे ५ डिसेंबर रोजी होणार आहे. 'भीमा तुम्हा वंदना' या शीर्षकाखालील माहिती पुस्तिकेत डॉ. आंबेडकर यांच्यावर आधारित अभिवादनपर गीतेही यंदाच्या पुस्तिकेची मध्यवर्ती संकल्पना आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित अशा गीतांचा समावेश पुस्तिकेत करण्यात आला आहे.

महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी, दादर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत -

चैत्यभूमी येथे शामियाना व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था.

नियंत्रण कक्षाशेजारी, प्रवेशद्वाराजवळ ११ ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा.

१ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.

संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था.

अग्निशमन दलामार्फत आवश्यक सेवा. स्ना‍नगृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.

चौपाटीवर सुरक्षारक्षकांसह बोटींची संपूर्ण परिसरात व्यवस्था.

चैत्यभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवरील खात्याद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था.

विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉलची रचना.

राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.

स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवासाची व्यवस्था.

मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटेवर आच्छादनाची व्यवस्था.

अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुग्यांची व्यवस्था.

मोबाईल चार्जिंगकरिता छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे पॉइंटची व्यवस्था.

फायबरच्या तात्पुरत्या स्नानगृहाची व तात्पुरत्या शौचालयांची पुरेशा संख्येने व्यवस्था.

रांगेतील अनुयायांसाठी तात्पु‍रते छत व बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था.

स्टॉलवरील ‘जीएसटी’ रद्द करावा फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाची मागणी

मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर लावण्यात येणाऱ्या स्टॉलधारकांना मुंबई महापालिकेच्या वतीने १८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. यामुळे स्टॉलधारकांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागते. यासाठी महापालिकेच्या वतीने जीएसटी कायमस्वरूपी माफ करण्यात यावा. अशी मागणी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष रमेश सोनवणे यांनी पत्राद्वारे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरांनी यांना केली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकर अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना आदरांजली देण्यासाठी येतात. यावेळी शिवाजी पार्क मैदानावर अनेक स्टॉल लावण्यात येतात. यात प्रामुख्याने पुस्तके, कॅलेंडर, बिल्ले, मूर्ती, संविधानाच्या प्रती व इतर वाचनीय साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यातून बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, जीवन चरित्र, विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्यात आला आहे. तसेच गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफ करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व टोलनाके मुक्त करण्यात आले आहेत. तर मग आंबेडकरी समुदायासोबत हा दुजाभाव का? असा संतप्त सवाल आंबेडकरी मंचाच्या वतीने विचारण्यात आला आहे. तसेच पालिकेच्या वतीने जीएसटी कायमस्वरूपी माफ करण्याची मागणी करणारे पत्र रमेश सोनवणे यांनी पालिकेला दिले आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’