मुंबई

पालिकेचे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन! पालिका मुख्यालयातील उपहारगृहात पुस्तक प्रदर्शन व विक्री

अश्विनी भिडे यांच्या हस्ते लोकार्पण

नवशक्ती Web Desk

मुंबई : इंटरनेट, मोबाईलच्या युगात पुस्तक वाचनाची गोडी कायम राहावी, मराठी भाषा संवर्धनासह वाचन संस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी मुंबई पालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचअंतर्गत आता मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या उपहारगृह परिसरात पुस्तक प्रदर्शन व विक्री दालन सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या शुभहस्ते सोमवारी या दालनाचे लोकार्पण करण्यात आले.

दरम्यान, पुस्तक विक्री दालनास पहिल्याच दिवशी महानगरपालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांसह अभ्यागतांचा चांगला प्रतिसाद लाभला. मराठी भाषेच्या संवर्धन व विकासाच्या दृष्टीने पालिकेच्या नाट्यगृहे व तरणतलावांच्या परिसरात पुस्तक विक्री दालनास निर्धारित कालावधीसाठी पुस्तक प्रकाशकांना जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने या वर्षाच्या सुरुवातीला घेतला होता. त्यानुसार यंदाच्या मराठी भाषादिनी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते दोन ठिकाणी पुस्तक विक्री दालनांचा शुभारंभ करण्यात आला होता. याच शृंखलेत आता पालिका मुख्यालयातील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर यापूर्वी चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य तरण तलाव परिसर, विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचा परिसर आणि बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह परिसर इत्यादी ठिकाणी पुस्तक विक्री दालने यापूर्वीच सुरू झाली असून त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.

मराठी भाषेच्या संवर्धन व विकासाच्या दृष्टीने तसेच वाचन संस्कृतीला हातभार लागावा म्हणून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत असतात. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे, नाट्यगृह व जलतरण तलावांचे समन्वयक संदीप वैशंपायन आणि डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते. तर पालिकेच्या अखत्यारितील इतर नाट्यगृहे व जलतरण तलाव यासह इतर काही महत्त्वाच्या ठिकाणीदेखील पुस्तक विक्री दालने सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती नाट्यगृहे व तरण तलावांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली

रस्त्यावर व न्यायालयात ओबीसींची लढाई लढणार! मंत्री छगन भुजबळ यांचा निर्धार

अखेर स्वदेशी बनावटीचे 'तेजस एमके-१ ए' आकाशात झेपावले; भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल

गुजरात मंत्रिमंडळात १९ नवे चेहरे; २६ मंत्र्यांना शपथ, उपमुख्यमंत्रीपदी हर्ष संघवी

मतचोरीचा मुद्दा कळीचा ठरणार?

कृतघ्न आणि असंवेदनशील महाराष्ट्र