'मुव्ही ट्रॅप' रोखणार डासांची उत्पत्ती; मलेरिया, डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव नियंत्रित होणार  
मुंबई

'मुव्ही ट्रॅप' रोखणार डासांची उत्पत्ती; मलेरिया, डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव नियंत्रित होणार

‘मुव्ही ट्रॅप’ या पर्यावरणपूरक सापळ्यातील आकर्षक घटकांमुळे मादी डास त्याकडे आकृष्ट होऊन पाण्यात अंडी घालते, मात्र त्यातील कीटकनाशकांमुळे ही अंडी लगेच नष्ट होतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखली जाऊन मलेरिया, डेंग्यू, झिका आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Swapnil S

मुंबई : ‘मुव्ही ट्रॅप’ या वापरण्यास अत्यंत सुलभ असणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या सापळ्याकडे त्यातील ‘ॲट्रॅक्टन्ट्स’मुळे डासाची मादी आकृष्ट होते आणि त्यातील पाण्यात अंडी घालते. ही अंडी पाण्यातील वैशिष्ट्यपूर्ण कीटकनाशकांमुळे तात्काळ नष्ट होतात. अशाप्रकारे डासांच्या उत्पत्तींवरच अर्थात मुळावरच घाव घातला जात असल्याने डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध होतो. मलेरियासह डेंग्यू, झिका, चिकनगुनिया यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांनादेखील प्रतिबंध होतो. त्यामुळे ‘मुव्ही ट्रॅप’ डासांची उत्पत्ती रोखत मलेरिया डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव नियंत्रित होण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या अखत्यारितील ‘सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल’च्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील विविध स्टार्टअप उद्योगांना बळ देण्याचे करण्यात येत असलेले कार्य अभिनंदनीय आहे, असे उद्गार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी काढले. 'मुव्हीट्रॅप' या डास निर्मूलनावेळच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पद्मश्री शास्त्रज्ञ प्रा. ए. पी. दाश, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, प्राध्यापक सुशांता कुमार घोष, दिल्लीस्थित ‘आयसीडीएचआय’ या संस्थेचे सल्लागार डॉ. रजनी कांत, पालिकेच्या व्यवसाय विकास कक्षाच्या डॉ. शशी बाला, नायर रुग्णालयातील 'प्रिव्हेंटिव्ह व सोशल मेडिसिन' विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर रुजुता हाडये, पालिका कीटकनाशक अधिकारी रितेश मरापे, 'मुव्ही ट्रॅप' या स्टार्टअप संस्थेचे प्रसाद फडके उपस्थित होते. 'मुव्ही ट्रॅप'चे उत्पादन पालिकेच्या अखत्यारितील 'सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल'चा भाग आहे.

साथीच्या आजारांना आळा

'मुव्ही बायो ट्रॅप हे ‘पॅसिव्ह’ आणि पर्यावरणाला अनुकूल असणारे उपकरण आहे. इको बायो ट्रॅप हे आकाराने छोटी असल्यामुळे ते घरामध्ये सहजपणे ठेवता येते. हे उपकरण लार्व्हा स्रोत व्यवस्थापनासाठी प्रभावी आहे. ‘इको बायो ट्रॅप’मुळे डासांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि चिकनगुनिया, डेंग्यू, झिका आणि मलेरियाच्या प्रादुर्भावाच्या वेळी सध्याच्या एकात्मिक डास नियंत्रण व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये याचा समावेश होऊ शकतो, अशी माहिती फडके यांनी दिली.

‘मुव्ही ट्रॅप’ असे करते काम

ट्रॅपमध्ये असणाऱ्या पिशवीतील ॲट्रॅक्टंट व कीटकनाशक (कीटक वाढ नियामक आयजीआर ग्रॅन्युअल) हे पाण्यात तत्काळ मिसळले जातात. ज्यानंतर पाण्यातील ॲट्रॅक्टंटमुळे डासाची मादी या पाण्याकडे आकर्षित होते व पाण्यात अंडी घालते तर पाण्यात असणारे सौम्य स्वरूपाचे कीटकनाशक डासांची अंडी नष्ट करते. डासांची अंडीच नष्ट झाल्यामुळे त्यांच्या प्रजोत्पादनाला प्रतिबंध होतो व पसरणाऱ्या आजारांनादेखील प्रतिबंध होतो.

वीजही लागत नाही

‘मुव्ही ट्रॅप’मध्ये असलेले पाणी हे साधारणपणे ४ आठवडे साठवून ठेवता येते. या सापळ्यात वापरण्यात आलेली ॲट्रॅक्टंट व कीटकनाशक ही माणसासाठी सुरक्षित आहेत. त्याचबरोबर डास प्रतिबंधासाठी वापरण्यात येणाऱ्या इतर यंत्रांप्रमाणे या सापळ्याला वीजदेखील लागत नाही.

Mumbai : खोटी विधाने करून कोर्टाची दिशाभूल करणे महागात पडले; हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला १ लाखाचा दंड

Mumbai : मे अखेरपर्यंत कोस्टल रोडवर दोन फ्लड गेट्स बसवणार; इंदूर येथे चाचणी झाली पूर्ण

Mumbai : ५० लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या 'डीआरआय'च्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबईत एक आठवडा ५ टक्के पाणीकपात; जलबोगद्यांचे क्लोरीनीकरण करणार

एसटी बस स्थानकांवरील शौचालये १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा