मुंबई : मुंबई सेंट्रल मराठा मंदिरासमोर नव्याने सुरू झालेल्या नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयातील १० मजल्यावरील निवासी डॉक्टरांच्या एका खोलीमध्ये शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजता आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नसून, ७ वाजून ५ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या घटनेची अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक पोलीस व मुंबई महापालिकेच्या विभागीय अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या बाजूला वसतिगृहाची ११ मजली इमारत आहे. या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ मार्च रोजी उद्घाटन झाले होते. शनिवारी सायंकाळी या इमारतीच्या १० व्या मजल्यावर अचानक आग लागली. हा वर्दळीचा परिसर असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची कायम ये-जा असते. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास इमारतीच्या १० व्या मजल्यावर एका खोलीमध्ये अचानक आग लागली. याची माहिती मिळताच इमारत परिसरात एकच धावपळ उडाली. आगीच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन, बेड, लाकडी कपाट, पुस्तके, कागदपत्रे, कपडे आदी साहित्य असल्याने आग भडकली. खबरदारी म्हणून तात्काळ इमारतीतील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. येथे डेंटल कॉलेज आणि रुग्णालय असल्याने आग खालच्या मजल्यापर्यंत पसरणार नाही, याची काळजी घेण्यात आली. चारही बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे सुमारे २० मिनिटांनंतर आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली याची अधिक चौकशी सबंधित यंत्रणेकडून केली जात असल्याचे सांगण्यात आले.