मुंबई

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर ‘एनसीबी’ने दिली क्लीन चिट

प्रतिनिधी

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात २५ दिवसांची कोठडी भोगून जामिनावर असलेला प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर ‘एनसीबी’ने क्लीन चिट दिली. आर्यन, मोहकसह सहा जणांविरोधात पुरावे नसल्याचे सांगत एनसीबीने अन्य १४ जणांविरोधात १० व्हॉल्यूमचे सहा हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान, ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांनी या प्रकरणात चुकीचा तपास केला म्हणून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया आलिशान क्रूझवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करत, ‘एनसीबी’ने २ ऑक्टोबर २०२१ रोजी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि गोमित चोपडा, नुपूर सारिका, मोहक जसवाल आणि मुनमुन धामेचा यांना कॉर्डिलिया क्रूझवरून ताब्यात घेतले होते. या प्रकरणी ‘एनसीबी’ने २० जणांना अटक केली. त्यांनतर त्यांच्याविरोधात सुरुवातीला ९० आणि त्यानंतर आणखी ६० दिवसांची न्यायालयाकडून आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ घेतल्यानंतर ‘एनसीबी’ने शुक्रवारी अखेर सहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात आर्यन खान, अविन साहू, गोपाल आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा, मानव सिंघल, यांच्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा करत त्यांना क्लीन चिट देत या प्रकरणातून नावे वगळण्यात आली आहेत. तर उर्वरित १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्यन खानवर एनसीबीने कारवाई केली; मात्र त्याच्याविरोधात न्यायालयात ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. आर्यनचा या प्रकरणात कोठेही सहभाग स्पष्ट होत नव्हता. त्यामुळे त्याला न्यायालयाने क्लीन चीट दिली. शिवाय दुसरीकडे आर्यनवर कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?

‘एनसीबी’ने २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर कारवाई केली होती. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकून त्यातून पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. याप्रकरणी ‘एनसीबी’ने या क्रूझवर आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला, नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे २० जणांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत