अगदी काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. अशामध्ये आता पुन्हा एकदा त्यांच्यावर शाईफेक करण्याची धमकी सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले यांच्याकडून ही धमकी देण्यात आली. त्यांच्याविरोधात पिंपरीमधील सांगवी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने आली आहे.
विकास लोले यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वर, 'आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार?मु.पो.सांगवी', 'पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या', आणि 'चंपाच तोंड काळे करा रे' अशा धमकीच्या आशयाच्या काही पोस्ट केल्या. त्यावरून आता मोठा वाद सुरु झाला आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले आणि दशरथ बाबुराव पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम १५३ अंतर्गत द्वेष पसरविणे आणि कलम ५०५ अंतर्गत धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे.