गिरीश चित्रे/मुंबई
दहिसर येथून दक्षिण मुंबईत येईपर्यंतचा लांबचा प्रवास त्यात वाहतूककोंडी यामुळे उपमहापौर संजय घाडी यांनी राणीबागेतील बंगला मिळण्याची मागणी केली. मात्र राणीबागेतील बंगला अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना देण्यात आला, तर आता सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच वैधानिक समिती अध्यक्षांसाठी नव्या कोऱ्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाड्या सेवेत दाखल होणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले.
महापौरपदी रितू तावडे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या सेवेसाठी सुमारे ३० ते ३५ लाख रुपये किंमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी उपलब्ध करून देण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्तांनाही त्याच प्रकारची वाहने देण्यात आली आहेत.
उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, तीन वैधानिक समिती अध्यक्ष, सहा विशेष समिती अध्यक्ष आणि प्रभाग समिती अध्यक्षांना स्कॉर्पिओ-एन वाहने देण्यात आली आहेत. मात्र ही वाहने लांबच्या प्रवासासाठी पुरेशी आरामदायी नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्याऐवजी इनोव्हा क्रिस्टा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार सभागृह नेते, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या सेवेसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. प्रत्येक वाहनाची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे.
जुन्या वाहनांचे फेरवाटप
प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या ताफ्यातील विद्यमान स्कॉर्पिओ-एन गाड्या वॉर्ड स्तरावरील सहायक आयुक्तांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर सहाय्यक आयुक्तांकडील जुन्या स्कॉर्पिओ गाड्या कार्यकारी अभियंत्यांच्या सेवेत वापरण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासन या प्रस्तावाबाबत सकारात्मक असून, लवकरच तो अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यास महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वाहन ताफ्यात पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे.