मुंबई

रेसकोर्सच्या जमिनीवर मुंबई सेंट्रल पार्कला वेग द्या!

नवनियुक्त पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आयुक्तपदाची धुरा सांभाळताच शनिवारी दोन्ही कामांचा आढावा घेत मुंबई सेंट्रल पार्कच्या कामाला वेग देण्याचे निर्देश दिले.

Swapnil S

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पात १७० एकर जमिनीवर उद्यान आणि रेसकोर्सच्या १२० एकर जमिनीवर मुंबई सेंट्रल पार्क साकारण्यात येत आहे. एकूण ३०० एकर जमिनीवर थीम पार्क होणार असून त्यात पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे पादचाऱ्यांना रेसकोर्सच्या जमिनीवरील मुंबई सेंट्रल पार्क ते कोस्टल रोड प्रकल्पातील उद्यानात आनंद लुटता येणार आहे. दरम्यान, नवनियुक्त पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आयुक्तपदाची धुरा सांभाळताच शनिवारी दोन्ही कामांचा आढावा घेत मुंबई सेंट्रल पार्कच्या कामाला वेग देण्याचे निर्देश दिले.

पालिका आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. भूषण गगराणी यांनी पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. भूषण गगराणी यांनी शनिवारी कोस्टल रोड आणि रेसकोर्सच्या कामाची पाहणी केली. महालक्ष्मी रेसकोर्सची एकूण २११ एकर जागा मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्यावर दिलेली होती. त्याची मुदत संपल्यानंतर या २११ एकर जागेपैकी १२० एकर जागा शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली, तर उर्वरित ९१ एकर जागा मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सचे प्रवेशद्वार, गवती धावपट्टी (ग्रास ट्रॅक), वाळूची धावपट्टी (सँड ट्रॅक), घोड्यांच्या तबेल्यांचे ठिकाण, पोलो मैदान तसेच प्रेक्षकगृह (गॅलरी) आदी सर्व ठिकाणी भेटी देऊन सध्या सु‌‌रू असलेला वापर आणि नियोजित आराखड्यानुसार केली जाणारी कार्यवाही यांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. रेसकोर्सवरील सार्वजनिक उद्यान आणि पलीकडील मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील उद्यान यांना जोडण्यासाठी भुयारी मार्ग, नागरिकांच्या तसेच वाहनांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था, पार्कच्या निर्मितीनंतर रेसकोर्स व सार्वजनिक उद्यान यांची सुरळीत देखभाल या दृष्टीने आवश्यक बारीकसारीक सर्व तपशिलांची माहिती उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी यावेळी दिली.

विहार क्षेत्र (प्रॉमिनाड), सागरी संरक्षण भिंत, सायकल ट्रॅक, पादचारी भुयारी मार्ग, हाजी अली आंतरमार्गिका तसेच उत्तरवाहिनी मार्गिकेचे काम इत्यादी ठिकाणच्या कामांची, प्रगतीची माहिती गगराणी यांनी घेतली. त्यानंतर मरीन ड्राइव्हच्या दिशेने दक्षिणवाहिनी भुयारी मार्गातून प्रवास करताना भुयारी मार्गातील आपत्कालीन स्थितीसाठी केलेल्या उपाययोजना, अग्निशमन सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरा या सर्वांची पाहणी केली. एवढेच नव्हे आपत्कालीन संपर्क यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून यंत्रणा तत्परतेने कार्यरत असल्याची खातरजमा देखील त्यांनी केली. दोन्ही जुळ्या बोगद्यांना जोडणारे छेद बोगदे, त्याचप्रमाणे उत्तर दिशेच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या भुयारी बोगद्याची त्यांनी पाहणी केली. प्रकल्पाची कामे वेळापत्रकाप्रमाणे पूर्णत्वास जातील, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना तसेच प्रकल्प सल्लागारांना दिल्या.

कोस्टल रोड-वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी लवकरच गर्डर लाँच

वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडण्यासाठी १२० मीटर लांब अडीच हजार टनाचा गर्डर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधान्याने कामे सुरू आहेत, असे कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता निकम यांनी नमूद केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त (जी दक्षिण) संतोष धोंडे, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम आणि संबंधित अधिकारी तसेच मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडचे सचिव निरंजन सिंग आदी उपस्थित होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी