मुंबई

नितेश राणेंना दिलासा, अटक टळली; पुढील सुनावणीला व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देश: संजय राऊत यांच्यावरील अब्रूनुकसानीचा खटला

Swapnil S

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहणाऱ्या आमदार नितेश राणे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिल्यानंतर अखेर सोमवारी ते माझगाव न्यायालयासमोर हजर झाले. महानगर दंडाधिकारी संग्राम काळे यांनी याची दखल घेत नितेश राणे यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आणि अजामीनपात्र वॉरंट रद्द केला. तसेच खटल्याची सुनावणी १३ मार्चला निश्‍चित करताना हजर राहण्याची ताकीद दिली.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बेताल विधाने करणाऱ्या नितेश राणेंविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याची दखल घेत कनिष्ट न्यायालयाचे दंडाधिकारी संग्राम काळे यांनी सुरुवातीला समन्स आणि त्यानंतर जामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही नितेश राणे न्यायालयात गैरहजर राहिले. अखेर न्यायालयाने ३१ जानेवारीला नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंटचा दणका दिला.

अटक टाळण्यासाठी त्यांनी आधी सत्र व नंतर हायकोर्टात धावाधाव केली. मात्र दोन्ही ठिकाणी पदरी निराशा पडली. उच्च न्यायालयाने पाच दिवसांचा न्यायालयात हजर रहाण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाच्या वॉरंटला न जुमानणाऱ्या नितेश राणेंना स्वत:ची अटक टाळण्यासाठी सोमवारी दुपारी त्यांनी महानगर दंडाधिकारी संग्राम काळे यांच्यापुढे हजेरी लावली. याची दखल घेत न्यायालयाने त्यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आणि अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्चला निश्‍चित करताना व्यक्तिश: हजर रहाण्याचे निर्देश दिले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस