मुंबई

कोणीही जागांची मागणी केलेली नाही!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२२ लोकसभा मतदारसंघांवर दावा करायचा, असे या बैठकीत ठरले

प्रतिनिधी

मुंबई : लोकसभेच्या जागांबाबत कोणीही काहीही मागितलेले नाही. हे फक्त मीडियातच चालविण्यात येत आहे. आम्ही चर्चेला बसून ज्या पक्षाला जितक्या जागा द्यायच्या आहेत, तितक्या देऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खासदारांची बैठक घेतली होती. त्यात शिवसेनेने मागील लोकसभा निवडणुकीत लढविलेल्या २२ मतदारसंघांवर दावा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. महाराष्ट्रात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. मात्र २ जुलै रोजी पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप झाला. अजितदादा हे देखील राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे एकूण तीन पक्ष सत्तेत वाटेकरी झाले. यामुळे लोकसभेचे जागावाटप होणार कसे, याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवरच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खासदारांची बैठक घेतली. शिवसेनेचे १३ खासदार यावेळी उपस्थित होते.

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढविली होती. त्यातील १८ ठिकाणी विजय मिळविला होता. मात्र, आपण सर्व म्हणजे २२ लोकसभा मतदारसंघांवर दावा करायचा, असे या बैठकीत ठरले. जागांच्या अदलाबदलीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, यावरही त्यात शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या या भूमिकेमुळे अजितदादा गटाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणीही जागा मागितलेल्या नाहीत. जी काही चर्चा आहे, ती फक्त मीडियातच आहे. आम्ही चर्चेला बसू व ज्या पक्षाला द्यायच्या आहेत तितक्या जागा देऊ, असे स्पष्ट केले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा