मुंबई : टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी झाल्यास समूहाची पारंपरिक कार्यपद्धती बदलू शकते आणि समाजसेवेपेक्षा नफ्याला अधिक महत्त्व मिळू शकते, अशी चिंता टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी शनिवारी व्यक्त केली.
भविष्यात भागधारकांची संख्या ३० ते ४० हजारांवर गेल्यास नफ्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता असून त्यामुळे टाटा समूहाच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल होईल, असे नोएल टाटा म्हणाले. समूहाची मूल्ये आणि परंपरा कायम राखण्यासाठी नियामक संस्था व संबंधित घटकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा टाटा ट्रस्ट्सचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.
टाटा ट्रस्ट्स आणि टाटा सन्सच्या संचालक मंडळात मालकी रचना व नेतृत्वावरून संघर्ष सुरू आहे. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सची सुमारे ६६ टक्के हिस्सेदारी असून त्यांनी शेअर बाजारातील नोंदणीला विरोध केला आहे. दुसरीकडे, १८.३७ टक्के हिस्सेदारी असलेल्या शापूरजी पालनजी समूहाने नोंदणीला पाठिंबा दिला आहे.
टाटा समूहाची मालकी रचना आणि संस्थात्मक स्वरूप यामुळे समूहाची मूल्ये पिढ्यानपिढ्या टिकून राहिली आहेत, असे नोएल टाटा यांनी नमूद केले. समाजसेवा आणि राष्ट्रउभारणी ही समूहाची प्रमुख उद्दिष्टे कायम राहतील. मात्र, मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत शिस्त आणि भांडवलाचे योग्य नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी निर्मिती क्षेत्रात समूह गुंतवणूक करत असून भारताच्या विकासात योगदान देण्याची भूमिका कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रिझर्व्ह बँकेने टाटा सन्सचा कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणून नोंदणी दर्जा रद्द करण्याचा अर्ज सप्टेंबरमध्ये फेटाळला होता. त्यामुळे अनिवार्य शेअर बाजार नोंदणी टाळण्याचा मार्ग बंद झाला. त्यानंतर संचालक मंडळाने नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच एन. चंद्रशेखरन यांना आणखी पाच वर्षांची मुदतवाढ दिली. नोएल टाटा यांनी या दोन्ही निर्णयांना विरोध केला होता.
टाटा ट्रस्ट्सचे उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी शेअर बाजारातील नोंदणीच्या बाजूने भूमिका घेतली आहे. नोंदणीमुळे पारदर्शकता, सक्षम कॉर्पोरेट प्रशासन आणि आर्थिक शिस्त वाढेल, असा त्यांचा युक्तिवाद आहे. टाटा ट्रस्ट्सची हिस्सेदारी कायम राहणार असल्याने लाभांशातून समाजसेवेचे उपक्रम सुरू ठेवता येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.