मुंबई

आता दिव्यांगांनाही १ ते ३ हजारांपर्यंत अर्थसहाय्य

Swapnil S

मुंबई : दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पालिका कार्यक्षेत्रातील सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य' योजनेंतर्गत एकरकमी अर्थसहाय्य केले जाणार आहे. सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजनेंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे ६० हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत या योजनेअंतर्गत वय वर्षे १८ वरील ४० टक्के दिव्यांगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येतील, म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील. तसेच ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येतील, म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे ओळखपत्र असणे आवश्यक आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा व व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे, यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना' सुरू करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत