मुंबई : भाजपच्या वतीने विक्रोळी येथे दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडियाचा आनंद लुटा, असे आवाहन केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे सलग चौथ्या वर्षी भव्य मराठी दांडियाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथे करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज संध्याकाळी ७ वाजता हा ‘मराठी दांडिया’ होणार असून यावेळच्या दांडियाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, मराठी दांडियाचे आयोजक व भाजप प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सुप्रसिद्ध मराठी संगीतकार, गायक अवधुत गुप्ते, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. दरम्यान, या भव्य मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. मुंबईतील पहिला मराठी दांडिया भारतीय जनता पक्षाने सुरू केला. या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष असून या मराठी दांडियाला मिळणारा वाढता प्रतिसाद बघून यंदा आम्ही विक्रोळीतील भव्य अशा छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे मराठी दांडिया कार्यक्रम ठेवला आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे आपल्या सुमधुर गायनाने मराठी दांडियाचे सादरीकरण करणार आहेत. तसेच मराठी सिनेसृष्टीतील व बॉलीवूडमधील सुप्रसिध्द कलाकारांची या कार्यक्रमात दररोज उपस्थिती राहणार आहे. हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला या मराठी दांडियासाठी निःशुल्क प्रवेश देण्यात येईल, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.
मराठी माणूस कायम भाजपच्या हृदयात!
भाजप नेहमीच सर्व समाजांना बरोबर घेऊन पुढे जात असतो. भाषा किंवा समाजाच्या आधारे भेदभाव न करता सर्वांसाठी विकासाचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्हाला मराठी माणसाची आठवण येत नाही, तर मराठी माणूस आमच्या हृदयात कायम वास करून असतो, असे म्हणत साटम यांनी विरोधकांना चिमटा काढला.