Mumbai : पालिका सभागृहातही पडसाद! ‘मोदी हाय हाय, विद्यार्थ्यांना न्याय द्या’; महापालिकेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी 
मुंबई

Mumbai : पालिका सभागृहातही पडसाद! ‘मोदी हाय हाय, विद्यार्थ्यांना न्याय द्या’; महापालिकेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

नीट पेपरफुटीनंतर सध्या देशभरात आंदोलन सुरू असतानाच, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहातही उमटले.

Swapnil S

मुंबई : नीट पेपरफुटीनंतर सध्या देशभरात आंदोलन सुरू असतानाच, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहातही उमटले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी ‘मोदी हाय हाय,’ ‘विद्यार्थ्यांना न्याय द्या,’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीतही महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहातील कामकाज पार पडले.

पेपरफुटीवरून देशातील वातावरण चांगलेच तापले असताना गुरुवारी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका सभागृह सुरू होताच, बॅनरबाजी करत नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘पेपरफुटी बंद करा,’ ‘विद्यार्थ्यांना न्याय द्या...’, ‘चोर है, चोर है, मोदी सरकार चोर है...’ ‘खुनी है खुनी है, मोदी सरकार खुनी है...’ ‘वंदे मातरम’, ‘जय भवानी जय शिवाजी,’ अशा घोषणा देत विरोधकांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. परंतु याला सभागृहामध्ये भाजप व शिवसेना नगरसेवकांकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही. एरवी मोदींविरोधात घोषणा दिल्यानंतर प्रतिउत्तर देणारे भाजप नगरसेवकही गप्प होते.

विरोधकांनी घातलेल्या गोंधळाच्या वातावरणात महापौर रितू तावडे यांनी सभागृहाचे कामकाज चालवले. विविध प्रस्तावांना मंजुरी दिली. यात नामकरणाच्या प्रस्तावाचाही समावेश होता. तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गोंधळ चालू असतानाही महापौर रितू तावडे यांनी दोन वेळा विरोधकांना समजावले. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे महापौर यांनी संपूर्ण कामकाज पूर्ण केले.

शोकप्रस्तावाने गोंधळ थांबवला

माजी नगरसेवक कुशल शर्मा यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव महापौर रितू तावडे यांनी सभागृहात मांडला. यावेळीही सभागृहात विरोधकांकडून गोंधळ सुरू होता. अखेर महापौर यांनी शोकप्रस्तावाच्या वेळी तरी शांत रहा, असे विरोधकांना सांगताच विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक आपापल्या बाकावर खाली बसले आणि सभागृहात अर्ध्या तासापासून सुरू असलेला गोंधळ थांबला.

सभागृहाबाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने!

सभागृह संपल्यानंतर विरोधक आपल्या पक्ष कार्यालयात जात होते. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक समोर आले. सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोघेही माघार घेण्यास तयार नसल्यामुळे सभागृहाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. साडेचार वाजता सभागृह संपल्यापासून पुढे पावणेसात वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरूच होती. विरोधकांनी तर सभागृहाबाहेर ठिय्या मारल्याने सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही तिथे ठाण मांडून बसले होते. अखेर पावणेसातच्या सुमारास सत्ताधारी व विरोधकांमध्ये शांततापूर्ण चर्चा झाली आणि सभागृहाबाहेरचा परिसर शांत झाला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२