मुंबई

अन्यथा १५ सप्टेंबरपासून टॅक्सीचालक जाणार बेमुदत संपावर

सीएनजीच्या वाढत्या दरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी चालक आक्रमक

देवांग भागवत

मुंबईकरांना येत्या १५ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. याचे कारण म्हणजे मागील ६ महिन्यांपासून शहरातील रिक्षा - टॅक्सीचालक युनियन्स भाडेवाढीबाबत शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत. मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांची १० रुपये इतक्या भाडेवाढीची मागणी आहे. तशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. परंतु सरकारकडून अद्याप याची दखल न घेता केवळ आश्वासने दिली जात आहेत. यामुळे रिक्षा-टॅक्सी युनियन्सने येत्या १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या सीएनजी दरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी ही प्रमुख मागणी असल्याचे टॅक्सी युनियनचे नेते ए.एल क्वाड्रोस यांनी सांगितले.

रेल्वे, बस पाठोपाठ मुंबईकरांचे वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून रिक्षा-टॅक्सीकडे पाहिले जाते. पदोपदी असलेल्या रिक्षा-टॅक्सी स्टँडवरून प्रतिदिन लाखो प्रवासी ये-जा करतात. सध्या टॅक्सीचे किमान भाडे हे २५ रुपये इतके आहे. त्यात १० रुपयांची वाढ करून ते ३५ रुपये इतके करावे अशी मागणी मागील सहा महिन्यांपासून टॅक्सी चालक संघटनांकडून करण्यात येत आहे. वाढत्या इंधन, सीएनजी दरवाढीमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो ६ रुपायांनी कपात केली आहे. मात्र ही कपात कमी असून त्याचा टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसत असल्याचे टॅक्सीमेन्स युनियनने म्हटले आहे. दरम्यान, मार्च २०२१ मध्ये सीएनजीच्या दरात एकूण ३२ रुपयांची वाढ केली गेली. सततच्या दरवाढीमुळे सध्या मुंबईतील टॅक्सी चालकांना रोजचे २५० ते ३०० रुपयांचे नुकसान सोसावे लागत असून शहरातील रिक्षा-टॅक्सी चालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

१ मार्चपासून म्हणजेच गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला भाडे वाढीबाबत केवळ आश्वासनच देण्यात येत आहे. आम्ही विश्वास ठेवत अनेकदा संप मागे घेतला. मात्र हजारो टॅक्सी चालकांचे होणारे आर्थिक नुकसान पाहता सरकारने तात्काळ भाडेवाढीचा निर्णय घ्यावा. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास मुंबईतील टॅक्सी चालकांपुढे संपावर जाण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

- ए. एल. क्वाड्रोस, नेते, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती