पालघर : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्यानंतर प्रशासनाने राबवलेले बचावकार्य अखेर शुक्रवारी (दि. २४) पहाटे पूर्ण झाले. या आपत्तीत दोन जणांचा मृत्यू झाला असून, रात्रभर चाललेल्या मोहिमेत २४४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
बचावकार्य पूर्ण
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, विविध यंत्रणांच्या मदतीने राबविण्यात आलेले बचावकार्य शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता पूर्ण झाले. सततच्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.
डहाणू, तलासरी सर्वाधिक प्रभाव
मुसळधार पावसामुळे डहाणू, तलासरीसह पालघर जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले. डहाणू येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा दोनवर पोहोचला. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वीही एका नाल्यातून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.
२४४ जणांना सुरक्षित बाहेर काढलं
रात्रभर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत पालघर शहरातून १२४ जणांची सुटका करण्यात आली. तलासरीतील एका कारखान्यात अडकलेल्या ६५ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर गुंडाळे येथील फार्महाऊसमध्ये अडकलेल्या २५ जणांनाही मदत पथकाने सुरक्षितस्थळी हलवले. याआधी गुरुवारी जिल्ह्यातील विविध भागांतून तब्बल ८९१ जणांची सुटका करण्यात आली होती.
'दहा वर्षांतील सर्वात भीषण पूर'
बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत पालघर जिल्ह्यात आलेल्या पुरांपैकी हा सर्वात भीषण पूर होता. अनेक गावांतील रस्ते, पूल आणि सखल भाग पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
पूरात घडल्या थरारक घटना
वसई पश्चिमेतील सनसिटी परिसरात एका भटक्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एका चालकाची कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत कारमधील चार प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
सायवान परिसरातही वाढत्या पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली होती. स्थानिक नागरिकांनी दोरांच्या सहाय्याने बसमधील चार प्रवासी आणि चालक-वाहक अशा एकूण सहा जणांची सुरक्षित सुटका केली.
वाहतूक पूर्ववत, पंचनामे सुरू
पूराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्ह्यातील अनेक रस्ते आणि पुलांवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे झालेल्या मालमत्ता आणि आर्थिक नुकसानीचे पंचनामे सुरू असून, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड या संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती प्रशासनाने दिली.