Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा (Photo- X)
मुंबई

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

समोर आलेल्या दृश्यांमध्ये तांदुळवाडी किल्ल्याच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा साचल्याचे दिसून आले.

किशोरी घायवट-उबाळे

पालघर : पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तांदुळवाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे किल्ल्याकडे जाणारा रस्ता धोकादायक बनला असून, पुढील काही दिवस पर्यटक आणि ट्रेकर्सनी तांदुळवाडी किल्ल्याला भेट देणे टाळावे, असे महत्त्वाचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सततच्या पावसामुळे परिसरात आणखी दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

तांदुळवाडी किल्ल्याकडे जाणारा मार्ग बंद

रविवारी समोर आलेल्या दृश्यांमध्ये तांदुळवाडी किल्ल्याच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा साचल्याचे दिसून आले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसर धोकादायक बनला असून, सुरक्षेच्या कारणास्तव किल्ल्यावर जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने पर्यटक आणि ट्रेकर्सना केले आहे.

पूरात अडकलेल्या कुटुंबाचा थरार

पालघरमधील केळवे परिसरातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवीपाडा येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आठ जण जवळपास चार तास घराच्या छतावर अडकून पडले होते. त्यात लहान मुलांचाही समावेश होता.

चारही बाजूंनी पाणी साचल्यामुळे त्यांना घराबाहेर पडता आले नाही. पाण्याची पातळी वाढत गेल्याने त्यांनी छतावर आश्रय घेतला. संबंधित कुटुंबाने चार तास कोणतीही मदत किंवा बचाव पथक घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप केला आहे. अखेर पाणी ओसरल्यानंतर ते सुरक्षित खाली उतरू शकले.

पूरामुळे मृतदेह छतावर ठेवण्याची वेळ

पालघरमधील आणखी एका हृदयद्रावक घटनेत, पूरपाण्यामुळे गावात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने एका कुटुंबाला मृत नातेवाईकाचा मृतदेह घराच्या छतावर ठेवावा लागला.

देवीपाडा येथील ५५ वर्षीय अनुसया मनोहर लिलाका यांचे ५ जुलै रोजी उपचारादरम्यान निधन झाले. कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड रेल्वे स्थानकापर्यंत आणला. मात्र, गावाकडे जाणारा रस्ता चार ते पाच फूट पाण्याखाली गेल्याने त्यांना पुढे जाता आले नाही.

अखेर नातेवाईकांनी मृतदेह खांद्यावर घेऊन पूरग्रस्त मार्ग ओलांडत घरी पोहोचवला. त्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने घराभोवती पाणी साचले. त्यामुळे मृतदेह वाहून जाऊ नये म्हणून तो काळ्या प्लास्टिकने झाकून घराच्या छतावर ठेवण्यात आला. सुमारे १२ तासांनंतर पाणी ओसरल्यावर कुटुंबीयांना अंत्यसंस्कार करता आले.

प्रशासन सतर्क

पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

ठाण्यात 'एसआयआर'ची गती मंद; ७४.५० लाख मतदारांपैकी केवळ २८ टक्क्यांपर्यंतच BLO पोहोचले

शिक्षकांमागे अशैक्षणिक कामांचा ससेमिरा; सरकारी शाळांपुढे अस्तित्वाचे संकट

Nandurbar : शासकीय वसतिगृहात अन्नातून विषबाधा? ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नाचे नमुने तपासणीसाठी

Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार