पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विराज प्रोफाइल एसएमएस या पोलाद निर्मिती कारखान्यात सोमवारी (दि. १७) सकाळी सुमारे ११.४५ वाजता भट्टीमध्ये पोलाद वितळविण्याची प्रक्रिया सुरू असताना भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, कारखान्याचे पत्रे दूरवर उडाले आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. दरम्यान, दुर्घटनेच्या कारणांची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
माहितीनुसार, या घटनेत धर्मेंद्र कुमार रामअवध शर्मा (४५) हे क्रेन चालक भाजले आहेत. त्यांना तातडीने बोईसर येथील स्टार लाईट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची माहितीही प्रशासनाकडून घेतली जात आहे.
शेजारील कारखान्यांच्या काचा फुटल्या
या घटनेचा परिणाम आसपासच्या औद्योगिक परिसरातही जाणवला. स्फोटानंतर घाबरलेल्या कामगारांनी कारखान्यांमधून बाहेर धाव घेतली. विराज प्रोफाइलच्या इमारतीवरील पत्रे दूरवर फेकले गेले, तर शेजारील काही कारखान्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती आहे.
अलार्म वाजताच कामगारांनी घेतला बाहेर पडण्याचा निर्णय
घटनेपूर्वी धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजला होता. त्यामुळे कारखान्यातील कामगारांना संभाव्य धोका लक्षात आला आणि त्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. या वेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारखाना परिसरातील परिस्थितीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राथमिक तपशील जाणून घेण्यात आला.
स्फोटाचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. भट्टीच्या प्रक्रियेदरम्यान नेमकी कोणती तांत्रिक अडचण निर्माण झाली, सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का आणि दुर्घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास केला जात आहे.
महाडनंतर तारापूरमधील घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रायगडमधील महाड एमआयडीसीमध्ये वायुगळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत तारापूर औद्योगिक वसाहतीत ही दुर्घटना घडली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, कारखान्याचे नेमके किती नुकसान झाले, याची माहितीही चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.