कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंधात सुरु असलेल्या रेल्वे प्रवासात आता पूर्णतः शिथिलता आली आहे. सर्व रेल्वे स्थानके पुन्हा गजबजू लागली आहेत; मात्र प्रवासी संख्या पूर्ववत होत असताना त्याच बरोबरीने स्थानकांवरील, पादचारी पुलांवरील फेरीवाल्यांचे बस्तान वाढू लागले आहे. उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवाशांसोबत फेरीवाल्यांचा संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रवाशांना प्रवास करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तर मागील अनेक दिवसांपासून रेल्वे पोलिसांकडून या ेरीवाल्यांना हटकण्यात येत नाही. परिणामी रेल्वे पोलिसांचे फेरीवाल्यांवर वचक नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
उपनगरीय रेल्वेवरील मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर तसेच पादचारी पुलांवर फेरीवाल्यांनी आपला तळ ठोकला आहे. सुरुवातीला बोटावर मोजण्याइतके फेरीवाले पाहायला मिळायचे; मात्र कोरोनानंतर लोकल पूर्ववत होत असताना या फेरीवाल्यांचा संख्येत वाढ होत आहे. सीएसएमटी, ठाणे, कल्याण, कसारा, कर्जत, पनवेल, कुर्ला, डोंबिवली, नालासोपारा, चर्चगेट, दादर, घाटकोपर दरम्यान अप आणि डाऊन धीम्या लोकलमध्ये, स्थानकांबाहेर तसेच रेल्वे पुलांवर फेरीवाल्याचा वावर सर्रास असतो. दरम्यान, गर्दीच्या वेळेतच लोकलमध्ये अथवा पादचारी पुलांवर फेरीवाले वावरत असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तर अनेकदा मोठमोठ्याने ओरडून मालाची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांचा आवाज असह्य होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत वारंवार प्रवासी संघटना, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला तसेच प्रसंगी रेल्वे प्रशासनाला सांगितले आहे; मात्र रेल्वे पोलीस आणि प्रशासनाकडून याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे लोकलमधील प्रवासी संख्या वाढत असताना फेरीवाल्यांना रोखण्यासाठी रेल्वेने तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांकडून तसेच प्रवासी संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
ठाणे स्थानकात फेरीवाल्यांवर कारवाईस टाळाटाळ
ठाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून स्थानकाच्या जिन्यापर्यंत फेरीवाले ठाण मांडून बसतात. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण बनले आहे, तर घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमेला फलाट क्रमांक एकवरील प्रवेशद्वाराला खेटूनच बसलेल्या फेरीवाल्यांमुळे हा प्रवेशमार्ग आक्रसला आहे. त्यातच मोठ्याप्रमाणात रिक्षाही उभ्या असल्याने त्यातून वाट काढून प्रवाशांना स्थानकात प्रवेश करावा लागतो. रेल्वे पुलावर चालताना बाकड्याचा अडथळा होत असल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपीना अटक केली; मात्र प्रवाशाने तक्रार केल्यानंतरच होणाऱ्या कारवाईबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे वर्चस्व आणि महानगरपालिका, तसेच रेल्वे प्रशासनाच्या कुचकामी यंत्रणेचे वाभाडे निघू लागले आहेत.