मुंबई

मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश; कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा करणार विकास

वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांचा प्रवास वेळखाऊ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक परिवहनासोबत ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ महत्त्वाची ठरते. यासाठी ‘पॉड टॅक्सी’ सेवा तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत दिले.

Swapnil S

मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवासात तासन् तास लागतात. त्यामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देणे सध्या गरजेचे आहे. त्यामुळे परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘पॉड टॅक्सी’संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत दिले. कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे वांद्रे व कुर्ला स्थानक परिसराचा विकास करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्टेशन, मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागात नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ हा उत्तम पर्याय ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या भागाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता जागतिक दर्जाची सेवा राहील याची काळजी घेण्यात यावी. स्टेशनबाहेर असलेले स्कायवॉक आणखी उपयोगात आणण्यासाठी चांगल्या संकल्पनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीला बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव (गृह) अनुप कुमार सिंग आदी उपस्थित होते.

सर्व परिवहन सेवांसाठी ‘सिंगल कार्ड’ची व्यवस्था

मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये ‘सिंगल कार्ड’च्या माध्यमातून प्रवास करता येण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. याच ‘सिंगल कार्ड’द्वारे ‘पॉड टॅक्सी’ची सेवाही नागरिकांना घेता आली पाहिजे, यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. ‘पॉड टॅक्सी’च्या अनुषंगाने कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा. कुर्ला स्थानक परिसरात असलेल्या पोलीस निवासाच्या जागेऐवजी पोलिसांना त्याच भागात अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या ‘पॉड टॅक्सी’ने स्टेशनला जोडण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये