ठाणे, पालघर, नाशिकच नव्हे तर राज्याची आरोग्य व्यवस्था मरणपंथाला आली आहे, गरिबांना उपचराचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार देण्याचे बंधन असलेल्या शासकीय रुग्णालय संस्थाच व्हेंटिलेटरवर गेल्याची स्थिती असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने स्वतःच्या पाहणी अहवालाद्वारे केला आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २४ मे रोजी एकाच वेळी एकाच दिवशी ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांना अचानक भेटी देत तेथील परिस्थितीचा आढावा मांडला आहे. या पाहणी दौऱ्यातील माहितीचे विश्लेषण करून एक अहवाल श्रमजीवी संघटनेने प्रकाशित केला असून ‘मरण पावलेल्या आरोग्य व्यवस्थेचे पोस्टमॉर्टेम’ असे शीर्षक या अहवालाला दिले आहे.
गरीब सामान्य माणूस उपचारावाचून वंचित असून खासगी रुग्णालये उपचार देताना महागड्या बिलांसह अनेकांना कर्जबाजारी बनवत आहेत. हजारो कुपोषणग्रस्त बालके, गर्भवती माता, नवजात अर्भके मृत्यूशय्येवर जात आहेत. मात्र यावर कोणीही बोलायला तयार नाही. या उलट देशात, राज्यात सध्या मंदिर, मस्जिद, भोंगा, दौरे, जात, धर्म, पंथाचे वाद यावरच राजकारण सुरू आहे. सत्ताधारी किंवा विरोधक कोणीही गरीब, सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत, असा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे .
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मे रोजी दिवसा तर ३१ मे रोजी मध्यरात्री संघटनेने वेगवेगळ्या टीम बनवून केलेल्या माहितीत धक्कादायक प्रकार समोर आले आहेत, तब्बल १००० पेक्षा जास्त कार्यकर्ते या कामासाठी फिरत होते. माहितीचे एकत्रिकरण करून प्रकाशित केलेला हा ‘पोस्टमार्टेम’ अहवाल म्हणजे आरोग्य संस्थेच्या मरणासन्न अवस्थेचा लेखाजोखाच म्हणावा लागेल.