मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ‘पॉटहोल क्विक फिक्स’ मोबाईल ॲॅपवर गत ४० दिवसांत खड्ड्यांविषयी एकूण ३ हजार ४५१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३ हजार २३७ तक्रारींचे निवारण ४८ तासांच्या आत पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तर, उर्वरित ११४ तक्रारींचे निवारण करण्याची कार्यवाही सुरू आहे.
खड्ड्यांव्यतिरिक्त इतर विभागांच्या ९३१ तक्रारी देखील या ॲपवर प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी ‘पॉटहोल क्विकफिक्स’ ॲपद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी, त्यांचे निवारण, प्रत्यक्षातील कार्यपद्धती यांचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) शिरीश निकम यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
असे आहे ॲप
पावसाळ्यादरम्यान रस्त्यांवर दिसून येणारे खड्डे तसेच दुरूस्तीयोग्य रस्त्यांसाठी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे ॲप विकसित केले आहे. त्यात खड्ड्यांचे छायाचित्र, स्थान आणि वर्णन अपलोड करून तक्रार त्वरित नोंदवता येते.