मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि स्थानिक लोकांमध्ये रविवारी सकाळी शेड उभारणीवरून वाद झाला. शेड उभारणीवरून वाद झाल्यामुळे प्रभादेवी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावारण तापू लागले आहे. प्रभादेवी येथील साईसुंदर नगर येथे शाखेसमोर शेड उभारण्यावरून समाधान सरवणकर आणि स्थानिक रहिवाशांमध्ये वाद झाला. यावेळी शिंदेसेनेचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. स्थानिकांनी समाधान सरवणकर यांना विरोध केला होता. शाखा उभारण्यात आली होती, त्या शाखेच्या बाहेर तात्पुरते शेड उभारण्यात येत होते, त्यावरून शिवसेना शिंदे गट आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर भांडणात झाले.
याच घटनेत एकमेकांच्या डोक्यात हेल्मेट घालण्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. प्रभादेवीतील वादासंदर्भात समाधान सरवणकर म्हणाले की, “वाद वगैरे काही नव्हता. तिकडची लोकंही आमची आहेत. त्यांना पाण्याची लाईन मीच दिलेली आहे. ५७ इंचांची मेन जलवाहिनी दिलेली आहे. त्याच इमारतीत निधीतून आणि स्व:खर्चातून जिम बांधून दिलेली आहे. त्या इमारतीत खूप कामे केलेली आहेत.”