मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत मुंबईतील आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या संख्येत गेल्या १५ वर्षांत तब्बल ७२ टक्क्यांनी घट झाल्याचे धक्कादायक वास्तव ‘प्रजा फाऊंडेशन’च्या ‘मुंबई एमएलए रिपोर्ट कार्ड २०२६’मधून समोर आले आहे.
१२व्या विधानसभेच्या (हिवाळी अधिवेशन २००९ ते पावसाळी अधिवेशन २०१०) काळात मुंबईतील आमदारांनी ७,९५५ प्रश्न उपस्थित केले होते. मात्र १५व्या विधानसभेच्या (हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५) कालावधीत ही संख्या केवळ २,२१३ वर आली आहे.
अहवालात मुंबईतील ३६ पैकी ३३ आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. उपस्थिती, विचारलेले प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी या निकषांवर गुणांकन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांना या क्रमवारीत समाविष्ट करण्यात आलेले नाही.
कामगिरीच्या क्रमवारीत काँग्रेसचे आमदार अव्वल ठरले आहेत. मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांनी ८२.८९ गुणांसह पहिले स्थान पटकावले. मालाडचे आमदार अस्लम शेख (८०.५८) दुसऱ्या, तर धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड (८०.३०) तिसऱ्या स्थानावर आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिन्डोशीचे आमदार सुनील प्रभू आणि भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवले.
अहवालानुसार, मुंबईतील आमदारांचे सरासरी वयही वाढत आहे. १२व्या विधानसभेत हे वय ५२ वर्षे होते, १३व्या विधानसभेत ५१, १४व्या विधानसभेत ५३ आणि १५व्या विधानसभेत ते ५७ वर्षांवर पोहोचले आहे.
प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, नागरिकांचे प्रश्न विधानसभेच्या पटलावर किती प्रभावीपणे मांडले जातात, हेच आमदारांच्या कामगिरीचे खरे मोजमाप आहे. काही आमदारांनी उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी एकूणच मुंबईतील आमदारांच्या विधिमंडळीन कामगिरीत मोठ्या तफावती दिसून येत आहेत.
भाजप-शिंदे सेनेचे आमदार मागून प्रथम
क्रमवारीच्या तळाशी शिवसेनेचे प्रकाश सुर्वे (३३वे), अशोक पाटील (३२वे) आणि भाजपचे राम कदम (३१वे) यांचा समावेश आहे. विधानसभेतील प्रश्नांची घटती संख्या आणि कामकाजातील मर्यादित सहभाग यामुळे लोकप्रतिनिधींच्या उत्तरदायित्वाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.